पिंपरीतही पुराचे थैमान

सकाळ वृत्‍तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

गेल्या दोन दिवसांपासून शहरासह मावळ परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी, पवना आणि मुळा नद्यांना पूर आला असून, त्यांनी धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. नदी काठच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. साहित्य स्थलांतर करताना नागरिकांची तारांबळ उडाली. महापालिकेने दोनशेहून अधिक कुटुंबांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविले.

पिंपरी - गेल्या दोन दिवसांपासून शहरासह मावळ परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी, पवना आणि मुळा नद्यांना पूर आला असून, त्यांनी धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. नदी काठच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. साहित्य स्थलांतर करताना नागरिकांची तारांबळ उडाली. महापालिकेने दोनशेहून अधिक कुटुंबांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविले. 

पवना धरण शंभर टक्के भरल्याने त्यातून रविवारी दुपारी १८ हजार क्‍युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीकिनारच्या भागांमध्ये पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जुनी सांगवीतील मधुबन कॉलनी क्रमांक एक ते दहा, मुळानगर परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. येथील दोनशे कुटुंबांची अग्निशामक दल, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने पोलिसांच्या मदतीने सुटका केली. महापालिकेच्या शाळा व समाज मंदिरांमध्ये पूरग्रस्तांना स्थलांतरित केले. पिंपरीतील पवना नदी काठच्या संजय गांधीनगर, सुभाषनगर, आंबेडकरनगर, भाटनगर आदी झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरल्याने तेथील रहिवाशांना स्थलांतरित केले.

चिंचवडगाव दशक्रिया घाटावर उभी असलेली मोटार पूर्णपणे पाण्यात बुडाली. मोटारीत कोणी नाही ना? याची खातरजमा करण्यासाठी अग्निशामक दलाने मोटारीच्या काचा फोडून पाहणी केली. शंकरनगर, कासारवाडी येथील भुयारी मार्गात अडकलेल्या मोटारीतील नागरिकांना अग्निशामक दलाने सुरक्षितरीत्या बाहेर काढले. वंजारवाडी चाळीतील व सरिता कुंज सोसायटीत पाणी शिरल्याने शंभरावर कुटुंबे विस्थापित झाली. महापालिकेचे ‘ह’ प्रभाग कार्यालय, साई औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीत आणि मार्गावर पाणी साचले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mula River Flood Rain Water Pimpri