मुळा रस्ता वस्तीत घाणीचे साम्राज्य 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019


पुणे ः मुळा रस्ता वस्तीतील पुराचे पाणी ओसरले असले, तरी मुळा रस्त्याच्या काही भागांतील घरे अद्याप पाण्यात आहेत. जनजीवन सुरळीत होण्यात नागरिकांना अडचणी येत आहेत. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

पुणे ः मुळा रस्ता वस्तीतील पुराचे पाणी ओसरले असले, तरी मुळा रस्त्याच्या काही भागांतील घरे अद्याप पाण्यात आहेत. जनजीवन सुरळीत होण्यात नागरिकांना अडचणी येत आहेत. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

रात्री उशिरापासून पाणी ओसरायला सुरवात झाली. संपूर्ण पूरबाधित परिसर चिखलमय झाल्याचे दिसून येत आहे. सकाळी पिण्याचे पाणी कमी दाबाने व दोनच तास आल्याने घर व अंगणातील चिखल साफ करता येत नसल्याचे येथील महिलांनी सांगितले. 
अनेक घरांमध्ये नाल्याचे सांडपाणी गेल्याने या भागात दुर्गंधी पसरली आहे. घराघरांत साप, गांडूळ, मोठी झुरळे, घुशी दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 
नागरिकांना संपूर्ण रात्र पाण्यात अंधारात जागरण करून काढावी लागली, मात्र दोन दिवस झाले तरी या भागात कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने विचारपूस केली नसल्याचे नागरिकांनी सांगितले; तसेच येथील आजी, माजी नगरसेवकांनी रात्री व सकाळी जेवण व नाश्‍त्याची सोय केली असली तरी पुढे काय, असा सवाल नागरिक करत आहेत. भविष्यात अशा समस्येला सामोरे जावे लागू नये, यासाठी या भागात संरक्षक भिंतीची बांधणी करावी, अशी नागरिकांनी मागणी केली आहे. 
-------------- 
स्थानिक रहिवाशांच्या प्रतिक्रिया 
---------------- 
ज्योती परदेशी ः पुराच्या पाण्याने घरातील जीवनावश्‍यक वस्तू खराब झाल्या आहेत. पुराचे मुरलेले पाणी घरातील फरशांमधून येत असल्याने घरात दलदल झाली आहे. महापालिकेने पाणी जास्त दाबाने सोडल्यास आम्हाला साफसफाई करता येईल. 
---------------------- 

लीला कदम ः दोन दिवस झाले, आम्ही घाणीच्या पाण्यात आहोत, मात्र साधी विचारपूस करायला कोणीही लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे अधिकारी आले नाहीत. लांबून रस्त्यावरूनच फक्त बघून गेले. आता हा पसारा आम्हालाच आवरायचा आहे. आपले दुखणे आपणच सोसायचे. 
--------------------- 

गौतम काकडे ः 7, मुळा रस्ता भागात पुरुष व महिलांसाठी एकच सामाईक स्वच्छतागृह आहे. तेथे चिखल आणि घाण साचल्याने सर्वांचीच विशेषतः महिलांची कुचंबणा होत आहे. 
----------------------- 
कोट 
-------------- 

वाकडेवाडी, मुळा रस्ता भागातील सुमारे एक हजार पूरग्रस्तांचे ज्या शाळांमध्ये स्थलांतर केले आहे त्या ठिकाणी विभागाच्या वतीने स्वच्छता करण्यात येत आहे. तेथील नागरिकांची आरोग्यतपासणी करण्यात येत असून परिसरात औषधफवारणी केली जात आहे. 
-सुनील कांबळे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Mula Road aria empire of the dirt.