मुळशी धरण भागाला प्रथमच संधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

पौड - राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आलेल्या मुळशी पंचायत समितीच्या सभापती कोमल गणेश वाशिवले यांची; तर उपसभापतिपदी पांडुरंग मारुती ओझरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर प्रथमच सभापतिपदाचा मान मुळशी धरण भागाला मिळाला आहे.

पौड - राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आलेल्या मुळशी पंचायत समितीच्या सभापती कोमल गणेश वाशिवले यांची; तर उपसभापतिपदी पांडुरंग मारुती ओझरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर प्रथमच सभापतिपदाचा मान मुळशी धरण भागाला मिळाला आहे.

पौड येथे पंचायत समितीच्या सभागृहात दोन्ही पदांची निवडप्रक्रिया पार पडली. सभापतिपदासाठी वाशिवले आणि उपसभापतिपदासाठी ओझरकर यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर केली. या वेळी तहसीलदार सचिन डोंगरे, निवासी नायब तहसीलदार नागेश गायकवाड, गटविकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, सहायक गटविकास अधिकारी रघुनाथ खाडे, तालुका कृषी अधिकारी गणेश तांबे आदी उपस्थित होते. 

निवड प्रक्रियेच्या सभागृहात राष्ट्रवादीच्या पंचायत समितीच्या चार सदस्यांबरोबरच शिवसेनेचे सचिन साठे हेही उपस्थित होते. 

या वेळी सभागृहाबाहेर जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, जिल्हा परिषद सदस्या अंजली कांबळे, सागर काटकर यांच्यासह तालुका निरीक्षक बबनराव भेगडे, तालुकाध्यक्ष सुनील चांदेरे, मावळते सभापती महादेव कोंढरे, उपसभापती सारिका मांडेकर, माजी सभापती उज्ज्वला पिंगळे, माजी उपसभापती सविता पवळे, गटनेते शांताराम इंगवले, सुभाष अमराळे, बाळासाहेब सणस, नंदू भोईर, आनंदा आखाडे, त्याचप्रमाणे तालुक्‍यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

कोमल वाशिवले या पौड गणातून विजयी झाल्या, तर पांडुरंग ओझरकर यांनी माण गणातून विजयश्री खेचून आणली होती. त्यामुळे दोघांच्याही पदग्रहण समारंभासाठी पौड आणि माण गणातील समर्थकांची मोठ्या संख्येने गर्दी होती. 

निवड जाहीर होताच पंचायत समितीच्या प्रांगणात फटाक्‍यांची आतषबाजी होत गुलाल, भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. सभापती, उपसभापतींनी आपल्या खुर्चीचा ताबा घेतल्यानंतर दोघांनीही छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घातला.

Web Title: Mulshi dam chance within the first