एक कोटीची लाच घेताना मुळशीच्या तहसीलदारास पकडले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

एसीबीच्या पथकाने काही दिवसांपूर्वीच भूमी अभिलेख कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव सांगून पावणे दोन कोटी रुपयांची लाच घेणाऱ्या एका नामवंत वकिलावर कारवाई केली होती. ही कारवाई आत्तापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे पथकाने स्पष्ट केले होते; तसेच या प्रकरणामध्ये संबंधित कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग आहे काय? याची पथकाकडून पडताळणी केली जाणार होती. त्यापूर्वीच तहसीलदारास लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्याची कारवाई पथकाने केली. 

पुणे : जमिनीच्या वारसा नोंदीच्या प्रकरणात निकाल देण्यासाठी आणि फेरफार करून सातबारा उताऱ्यावर नोंदणी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाकडून एक कोटी रुपयांची लाच घेताना मुळशीच्या तहसीलदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी रंगेहाथ पकडले. लवासा रस्त्यावर "एसीबी'च्या पथकाने ही कारवाई केली. 

सचिन महादेव डोंगरे (वय 43 , रा. लेझी रॉक सोसायटी, बावधन) असे ताब्यात घेतलेल्या तहसीलदाराचे नाव आहे. डोंगरेविरुद्ध पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. "एसीबी'च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्‍यामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाची वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीसंदर्भातील वारस नोंदीचे प्रकरण मंत्रालयामधून काही दिवसांपूर्वी फेरचौकशीसाठी डोंगरे यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते. या प्रकरणामध्ये ज्येष्ठ नागरिकाच्या बाजूने निकाल देण्यासाठी आणि फेरफार करून सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी डोंगरे यांनी त्यांच्याकडे एक कोटी रुपयांची मागणी केली होती. 

याबाबत ज्येष्ठ नागरिकाने "एसीबी'कडे तक्रार दिली होती. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर "एसीबी पुणे'चे पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा, पोलिस निरीक्षक संजय पतंगे, सुरेखा घार्गे यांच्या पथकाने मुळशी तालुक्‍यातील लवासा रस्ता येथे सापळा रचला. डोंगरे यांनी तक्रारदाराकडून एक कोटी रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. 

एसीबीच्या पथकाने काही दिवसांपूर्वीच भूमी अभिलेख कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव सांगून पावणे दोन कोटी रुपयांची लाच घेणाऱ्या एका नामवंत वकिलावर कारवाई केली होती. ही कारवाई आत्तापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे पथकाने स्पष्ट केले होते; तसेच या प्रकरणामध्ये संबंधित कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग आहे काय? याची पथकाकडून पडताळणी केली जाणार होती. त्यापूर्वीच तहसीलदारास लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्याची कारवाई पथकाने केली. 
 
Web Title: Mulshi tahsildar arrested for 1 crore bribe Pune