बहुरंगी बालदिवाळी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 नोव्हेंबर 2018

पुणे  : दिवाळीच्या स्वागतासाठी मुली हसतखेळत पणत्या रंगवून त्या सजवत होत्या. काही मुलींनी मुख्याध्यापकांच्या कक्षाबाहेर फुलांची अप्रतिम रांगोळी काढली आणि आनंदानं जल्लोष केला. शाळा जर आनंदशाळा झाली, तर दिवाळीचा आनंद शतपटींनी वाढतो. प्रभात रस्त्याजवळील डॉ. श्‍यामराव कलमाडी माध्यमिक (कानडी माध्यम) शाळेतील मुलामुलींच्या आनंदाला उधाण आलं होतं. दिवाळी सुटी सुरू व्हायचा हर्ष एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला यंदाच्या दिवाळीसाठी केलेल्या सृजनाचं समाधान.

निकिता म्हणाली, "दिवाळीची सुटी सुरू होण्याआधी आमची परीक्षा चालू होती; म्हणून आम्हाला पणत्या सजवायला जास्त वेळ मिळाला नाही. कमी वेळात झटपट, तरीही छान काम करण्याचा वेगळाच अनुभव यातून घेतला.'' लक्ष्मी सांगत होती की, आमच्या शिक्षिकांनी आम्हाला मातीच्या पणत्या, ऍक्रिलिक रंग, टिकल्या, छोटे आरसे उपलब्ध करून दिले. रंगसंगती व सजावट आम्ही आमच्या कल्पनेनं केली.'' वासंतीनं केलेल्या सुरेख पणत्या घरी नेल्यावर त्या पाहून तिच्या भावंडांनीही पणत्या सजवल्या. मग शेजारच्या दुसऱ्या मुलांमध्येही याची चढाओढ लागली. 

वैष्णवी म्हणाली, "आम्ही दर वर्षी दिवाळीला पणत्या रंगवतो व सजवतो. काही पणत्या आम्ही घरी नेतो. काही शाळेत ठेवतो. शाळेत येणाऱ्या पाहुण्यांना या पणत्या भेट दिल्या जातात. शाळेतील गरीब मुलांसाठी निधी देऊ इच्छिणारे हितचिंतक पणत्यांची ऑर्डर नोंदवितात. आम्ही केलेल्या कलाकृतीच्या माध्यमातून अशा तऱ्हेनं समाजसेवेचं समाधान मिळतं. त्यामुळे दिवाळीचा आनंद दुप्पटीनं वाढतो.'' 

कार्यालयातील सेविका मनीषाताई मुख्याध्यापकांच्या कक्षासमोर फुलांची आरास करत होत्या. ती बातमी क्षणात शाळेत पसरली. "आम्हाला 
शिकवा, आम्हालासुद्धा फुलांची रांगोळी शिकायची आहे,'' असा आग्रह करत मुली भराभर तिथं जमल्या. मनीषाताईंनी त्यांना झेंडू, शेवंती अन्‌ गुलाबाची फुलं दिली. आरास कशी करायची ते समजावून सांगितलं. रेखा, अनुजा, स्नेहा व रेणुका म्हणाल्या, ""आता आम्ही घरी फुलांची रांगोळी घालून आई-बाबांना आश्‍चर्याचा धक्का देऊ. यातलं कौशल्य जास्तीत जास्त वाढावं म्हणून यंदाच्या सुटीत आम्ही सराव करत राहू. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Multicolored child diwali