‘बॉलिवूड’साठी मुंबईच योग्य - रणजित

हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायक व्यक्तिरेखांसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते रणजित मंगळवारी पुण्यात आले होते.
Actor Ranjeet
Actor RanjeetSakal
Summary

हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायक व्यक्तिरेखांसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते रणजित मंगळवारी पुण्यात आले होते.

पुणे - ‘चित्रपट सृष्टीसाठी (Film Industry) योग्य संस्कृती (Culture) आणि वातावरण (Atmosphere) मुंबईतच (Mumbai) आहे, त्यामुळे ‘बॉलिवूड’ला (Bollywood) उत्तर प्रदेशात जायचे असते तर यापूर्वीच गेले असते, असे सांगून ‘सरकारच्या आश्वासनांच्या खैरातींवर चित्रपट निर्माण होत नाहीत. त्यासाठी केवळ ‘पॅशन’ असावे लागते,’ अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते रणजित (Ranjeet) यांनी ‘बॉलिवूड’ स्थलांतराची शक्यता मंगळवारी फेटाळून लावली.

हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायक व्यक्तिरेखांसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते रणजित मंगळवारी पुण्यात आले होते. त्यावेळी भरत मित्र मंडळाच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर रणजित यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चित्रपट सृष्टीतील पदार्पण, आलेले अनुभव, दिग्गज नेत्यांनी केलेली मदत आणि वेबसिरीज आणि दक्षिणात्य चित्रपटांचा असलेला बोलबाला यावर त्यांनी सविस्तर गप्पा मारल्या. ‘पूर्वी चित्रपट आवडीने तयार केले जायचे. आता मात्र विकले जातील, असे चित्रपट तयार होत असून, त्यामधील ‘आत्मा’ हरवला आहे,’ अशा शब्दांत त्यांनी सध्याच्या ‘बॉलिवूड’ विरुद्ध ‘दाक्षिणात्य’ चित्रपट वादावर भाष्य केले.

‘बॉलिवूड’साठी मुंबईच योग्य असल्याचे सांगून ते म्हणाले,‘‘अनेक वर्षांपूर्वी नोएडा विकसित झाले, त्यावेळीही चित्रपटसृष्टी तिथे स्थलांतरित होणार होती. त्यासाठी तत्कालीन सरकारने विविध स्टुडिओंसाठी मोठ-मोठ्या जमिनीही दिल्या होत्या. मात्र, तेथील वातावरण व संस्कृतीमुळे चित्रपटसृष्टी तिथे गेली नाही. सरकारच्या आश्वासनांच्या खैरातींमुळे चित्रपट निर्माण होत नाहीत. ते विना पैशाचेही तयार होऊ शकतात. त्यासाठी केवळ आवड हवी.’’.

‘अभिनेते दिलीप कुमार यांच्या काळातही दाक्षिणात्य चित्रपट तयार व्हायचे. ‘कॉपीराइट’ नव्हते, त्या वेळी दोन्ही चित्रपट सृष्टीत एकमेकांच्या विषयांची देवाण-घेवाण व्हायची. आता दाक्षिणात्य चित्रपट यशस्वी होत आहेत. त्याचा अर्थ हिंदी चित्रपट सृष्टी मागे पडतेय, असा होत नाही,’ असेही ते म्हणाले.

सुनील दत्त यांनी केले नामकरण

‘माझे खरे नाव गोपाल आहे. मी मूळचा पंजाबी असून, दिल्लीत वाढलो आहे. मी ‘डुरंड’ फुटबॉल स्पर्धा खेळणारा सर्वांत तरुण खेळाडू आहे. मी गोलकीपरचे काम करायचो, त्यामुळे ‘गोली’ हे माझे टोपण नाव होते. अभिनेते सुनील दत्त यांनी मला ‘रणजित’ हे नाव दिले,’ असेही त्यांनी सांगितले.

रस्त्यांच्या खोदाईचा फटका

पुणे शहरात ठिकठिकाणी सुरू असलेली खोदाई, अर्धवटपणे बुजविण्यात आलेले खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीची फटका रणजित यांनाही बसला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले होते. पेठांमध्ये असलेल्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत नाराजी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com