मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाटमारी करणारी टोळी जेरबंद

गणेश बोरुडे
गुरुवार, 22 जून 2017

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनचालकांना अडवून लुटमार करणारी सात दरोडेखोरांची टोळी तळेगाव पोलिसांनी आज (पहाटे) अवघ्या तीन तासात जेरबंद केली. पकडलेले सर्व दरोडेखोर नगर जिल्ह्यातील नेवासा आणि शेवगाव तालुक्‍यातील आहेत.

तळेगाव स्टेशन (पुणे) - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनचालकांना अडवून लुटमार करणारी सात दरोडेखोरांची टोळी तळेगाव पोलिसांनी आज (पहाटे) अवघ्या तीन तासात जेरबंद केली. पकडलेले सर्व दरोडेखोर नगर जिल्ह्यातील नेवासा आणि शेवगाव तालुक्‍यातील आहेत.

आज पहाटे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ओझर्डे ओव्हरब्रीजखाली गाडी थांबून तोंड धुणाऱ्या दांम्पत्यास चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोन्याची चैन, हातघड्याळ आणि पाच हजार रुपये रोख असा एकूण 50 हजारांचा ऐवज लुटला. त्यानंतर दरोडेखोर शेजारच्या डोंगरात पसार झाले. सदर घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे निरीक्षक मुगुटराव पाटील, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्वरित घटनास्थळी जाऊन लगतचा डोंगर पिंजून काढला. दरम्यान एक इसम संशयास्पदरित्या फिरताना दिसला. त्याची सखोल चौकशी केली असता त्याचे इतर साथीदार डोंगरात पुलाखली लपल्याचे समजले. पथकाने त्वरित गराडा घालून सात जणांसह एक अल्टो, एक सॅन्ट्रो अशा दोन कार आणि हत्यारे असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरोडेखोर अविनाश अरुण खंडागळे (22, गंगानगर, ता. नेवासा, अ.नगर), कैलास लक्ष्मण चांदणे (23, संभाजीनगर, नेवासा फाटा, अ.नगर), संतोष सुंदर घुणे (23, बहिरवाडी, ता. नेवासा, अ.नगर), संदीप कचरु भालेराव (27, गंगानगर, ता. नेवासा, अ.नगर), सचिन रतन कांबळे (20, सामनगाव, ता. शेवगाव, अ.नगर), बाळकृष्ण ज्ञानेश्वर मंडलिक (25, संभाजीनगर, ता. नेवासा, अ.नगर), प्रदीप ज्ञानेश्वर मंडलिक (22, संभाजीनगर, ता. नेवासा, अ.नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सदर गुन्हेगारांची पार्श्वभूमी तपासली असता त्यांच्यावर अहमदनगर, बुलढाणा, पुणे जिल्ह्यात जबरी चोरी, बेकायदा शस्त्रे बाळगणे, दरोडा अशा गंभीर प्रकारचे गुन्हे नोंद असल्याचे निष्पन्न झाले. प्रकाश वाघमारे, नितीन साळुंखे, दिपक काठे, अजय काळे, जयराज पाटणकर, संतोष जगताप, महेंद्र रावते, प्रशांत बुणगे, स्वप्नील गरुड, विशाल शिंदे, गणेश डावखर आदी पोलिस कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते.

Web Title: mumbai news pune news crime news sakal news robbery news