मुंबईतील पावसाचा शेतकऱ्यांना फटका 

रवींद्र पाटे
सोमवार, 29 जुलै 2019

मुंबई शहरात झालेली अतिवृष्टी व माळशेज घाटमार्गे ठप्प झालेल्या वाहतुकीचा परिणाम होऊन जुन्नर तालुक्यात भाजीपाल्याच्या बाजारभावात मोठी घट झाली आहे. जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजारात कोंथिबीर व मेथीच्या बाजारभावात मोठी घसरण झाली. त्यामुळे उत्पादक अडचणीत सापडले आहेत. 

पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये भाजीपाल्याच्या बाजारभावात मोठी घट; वाहतूक ठप्प झाल्याचा परिणाम 

नारायणगाव (पुणे) : मुंबई शहरात झालेली अतिवृष्टी व माळशेज घाटमार्गे ठप्प झालेल्या वाहतुकीचा परिणाम होऊन जुन्नर तालुक्यात भाजीपाल्याच्या बाजारभावात मोठी घट झाली आहे. जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजारात कोंथिबीर व मेथीच्या बाजारभावात मोठी घसरण झाली. त्यामुळे उत्पादक अडचणीत सापडले आहेत. 

जुन्नर व आंबेगाव तालुक्‍यांत शुक्रवारी (ता. 26) मध्यरात्रीपासून पाऊस सुरू झाला आहे. त्याने भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने उपबाजारात भाजीपाल्याची आवक घटली. त्यामुळे भाजीपाल्याचे बाजारभाव वाढणे अपेक्षित होते. मात्र, फ्लॉवर, मिरची, कोबी, काकडी आदी भाजीपाल्याच्या बाजारभावात दहा ते वीस टक्के घट झाली असून, वांगी, दुधी भोपळा मातीमोल झाला आहे. कोंथिबीर व मेथीच्या बाजारभावात पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा जास्त घट झाली आहे.

पावसामुळे भिजून कोंथिबीर व मेथी सडण्याचे प्रमाण वाढते. यामुळे उपबाजारात कोंथिबीर व मेथीची आवक साठ टक्‍क्‍यांनी घटली आहे. शनिवारी (ता. 27) रात्री येथील उपबाजारात कोंथिबीर व मेथीच्या सुमारे 49 हजार जुड्यांची आवक झाली होती. जुडीला शेकडा शंभर रुपये ते एक हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. शुक्रवारी रात्री झालेल्या लिलावात कोंथिबीर व मेथीच्या जुडीला शेकडा पाचशे रुपये ते दोन हजार रुपयांदरम्यान भाव मिळाला होता. येथील टोमॅटो उपबाजारात शनिवारी टोमॅटोच्या सुमारे चाळीस हजार क्रेटची आवक झाली होती. टोमॅटो क्रेटला प्रतवारीनुसार तीनशे रुपये साडेचारशे रुपये भाव मिळाला. टोमॅटो क्रेटच्या भावात शंभर रुपये ते दीडशे रुपये घट झाली आहे. 

ओतूर येथील उपबाजारात शनिवारी रात्री भाजीपाल्याच्या 3 हजार 346 डागांची आवक झाली होती. त्यापैकी फ्लॉवर व मिरचीच्या सर्वाधिक 2 हजार 234 डागांची आवक झाली होती. फ्लॉवर व मिरचीला प्रती किलोग्रॅम अनुक्रमे पाच रुपये ते अकरा रुपये व दहा रुपये ते 44 रुपये भाव मिळाला. दुधी भोपळा व वांग्याला सर्वांत कमी प्रतिकिलो एक रुपया ते तीन रुपयांदरम्यान मातीमोल भाव मिळाला. 

मुंबईमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे व माळशेज मार्गे मुंबईला होणारी वाहतूक ठप्प झाल्यामुळे बाजारभावात घट झाल्याची माहिती व्यापारी देत आहेत. 

शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग 
फेब्रुवारी ते जूनदरम्यान पाणीटंचाई असल्यामुळे भाजीपाल्याला उच्चांकी भाव मिळतील, असा अंदाज शेतकरी वर्गातून व्यक्त होत होता. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांनी मार्च ते एप्रिलदरम्यान भाजीपाल्याची लागवड केली होती. सध्या या भाजीपाल्याचा तोडणी हंगाम सुरू आहे. बाजारभाव घसरल्याने उत्पादकांचा अपेक्षाभंग झाला आहे. घटलेल्या बाजारभावामुळे काही उत्पादकांचा काढणी, वाहतूक खर्चसुद्धा वसूल झाला नाही. एका दिवसातच बाजारभावात पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा जास्त घट झाल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai rainfall loss to farmers