बीआरटी मार्गांवर मुंढेंची झाडाझडती 

बीआरटी मार्गांवर मुंढेंची झाडाझडती 

पुणे - बीआरटी मार्गांवर बस धावतात कशा, प्रवाशांची चढ-उतार कोणत्या पद्धतीने होते, जीपीएस यंत्रणा कार्यान्वित कशी होते, बीआरटी मार्गावर पायाभूत सुविधा कितपत आहेत, याची पाहणी करून त्यात सुधारणा करण्यासाठी पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी लगेच जागेवरच आदेश दिले. बीआरटी मार्गांची झाडाझडती करताना बेशिस्तीबद्दल दोन वाहकांना तत्काळ निलंबित करून अन्य दोघांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेशही त्यांनी दिले. 

पीएमपीची सूत्रे स्वीकारल्यावर मुंढे यांनी पहिल्यांदाच शहरातील बीआरटी मार्गांची शुक्रवारी सकाळी नऊ ते दुपारी तीनदरम्यान पाहणी केली. स्वारगेट-कात्रज, स्वारगेट-हडपसर, नगर रस्ता आणि विश्रांतवाडी या बीआरटी मार्गांवर त्यांनी बसमधून दौरा केला. त्या वेळी पीएमपीचे विधी अधिकारी त्र्यंबक धारूरकर, वाहतूक महाव्यवस्थापक सुनील गवळी, सुरक्षा अधिकारी अविनाश डुंबरे आदी त्यांच्यासमवेत उपस्थित होते. बीआरटी मार्गांवर पायाभूत सुधारणा करण्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागांची आणि बीआरटी मार्गांतून जाणाऱ्या खासगी वाहनांवर कारवाई करण्यासाठी त्यांनी वाहतूक पोलिसांची मदत घेण्याचा आदेश त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिला. 

कात्रज स्थानकाची पाहणी करताना तेथे अस्वच्छतेबद्दल त्यांनी आगाराला पाच हजार रुपयांचा दंड सुनावला. तसेच स्थानकालगतच्या पोलिस चौकीसमोर वाहने बेशिस्तपणे उभी राहिल्याबद्दल त्यांनी पोलिसांनाही सूचना केल्या. कात्रजहून स्वारगेट चौकापर्यंत बीआरटी मार्गावर बसमधून प्रवास करताना त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला. सर्वच प्रवाशांनी तिकिटे घेतली आहेत का, याची खातरजमाही केली. सोलापूर रस्त्यावर फातिमानगर चौक ते हडपसर स्थानकापर्यंत त्यांनी बसने प्रवास केला. तेव्हा बीआरटी मार्गातून खासगी वाहने जात असल्याचे दिसल्यावर वाहतूक पोलिसांशी संपर्क साधण्यास त्यांनी सांगितले. त्यानंतर वाघोली बस स्थानकाची त्यांनी पाहणी केली. तेथील पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी महापालिकेशी त्यांनी संपर्क साधला. येरवडा-विश्रांतवाडी बीआरटी मार्गाची पाहणी करताना बसमध्ये जीपीएस यंत्रणा कार्यान्वित आहे का, बीआरटी स्थानकांवर स्वच्छतेबाबतही त्यांनी पाहणी केली. स्वयंचलित दरवाजांमधील त्रुटी दूर करण्याचाही आदेश त्यांनी प्रशासनाला दिला. 

दौऱ्यातील महत्त्वाचे 
- कात्रज बीआरटी मार्गावर बसमध्ये प्रवासी चढण्यापूर्वी वाहकाने "डबल बेल' दिल्याचे मुंढे यांना दिसले. बसमध्ये प्रवासी चढत असताना बस निघू लागली होती. त्यामुळे मुंढे यांनी आदेश दिल्यावर चालकाने बस थांबविली. या बेशिस्तीमुळे मुंढे यांनी वाहकाला निलंबित करून त्याची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले. 

- बीआरटी पाहणी दरम्यान एक बस वेळेपूर्वी 20 मिनिटे मार्गावर सोडण्यात आल्याचे मुंढे यांना आढळले. त्यामुळे त्यांनी संबंधित वाहकालाही निलंबित करून त्याची चौकशी करण्याचा आदेश दिला. 

- कात्रज स्थानकावर एक कर्मचारी तंबाखू खाऊन काम करीत असल्याचे मुंढे यांना दिसले. त्यामुळे त्यांना त्याला एक दिवसांसाठी निलंबित केले. पीएमपीचा पदभार स्वीकारल्यावर मुंढे यांनी तंबाखू, पान, मावा, गुटखा खाऊन काम न करण्याचा आदेश कर्मचाऱ्यांना दिला आहे. 

- बेशिस्तीबद्दल विश्रांतवाडी, वाघोलीतील दोन कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचेही आदेश मुंढे यांनी प्रशासनाला दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com