मुंढवा पोटनिवडणुकीत "जाऊबाई' जोरात ; राष्ट्रवादीच्या पूजा कोद्रे विजयी; भाजपला मतदारांनी नाकारले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

या प्रभागात चंचलाताईंनी मोठी कामे केली आहेत. त्यामुळे लोकांनी मला निवडून दिले. हा विश्‍वास सार्थ ठरवीन. येथील लोकांना चांगल्या सुविधा पुरविण्याचा माझा प्रयत्न असेल.'' 
- पूजा कोद्रे 

पुणे : महापालिकेच्या मुंढवा-मगरपट्टा सिटीमधील (प्रभाग क्र.22) पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली असून, या पक्षाच्या पूजा कोद्रे यांनी विजय मिळवून राष्ट्रवादीचा गड राखला. कोद्रे यांनी शिवसेनेच्या मोनिका तुपे यांचा 3 हजार 528 मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे, या निवडणुकीत भाजपची जबरदस्त पीछेहाट झाली असून, भाजपच्या सुकन्या गायकवाड यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. या निकालामुळे हडपसरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. 

या निवडणुकीत कोद्रे यांना 8 हजार 991 मते मिळाली, तर शिवसेनेच्या तुपे यांना 5 हजार 479 मते मिळविली. गायकवाड यांच्या पारड्यात जेमतेम 4 हजार 334 मते पडली. गेल्या निवडणुकीत गायकवाड यांना 11 हजार 400 मते मिळाली होती. राष्ट्रवादीच्या विजयापेक्षा भाजपची घटलेली मते हेच या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. 

माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनामुळे ही निवडणूक झाली. त्यासाठी राष्ट्रवादीकडून कोद्रे यांच्या जाऊबाई पूजा, भाजपच्या सुकन्या गायकवाड आणि शिवसेनेच्या मोनिका तुपे रिंगणात होत्या. या प्रभागातील एका जागेसाठी शुक्रवारी मतदान झाले. शनिवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरवात झाली, तेव्हा पहिल्या फेरीपासून कोद्रे यांनी दीड हजार मतांची आघाडी घेतली. ती शेवटच्या फेरीअखेर कायम ठेवत, कोद्रे यांनी विजय मिळविला. 

मुंढवा-मगरपट्‌टा सिटी भागात वर्चस्व कायम राखण्यासाठी राष्ट्रवादीने प्रभावी प्रचार यंत्रणा उभारली होती, तर राष्ट्रवादीला त्यांच्याच बालेकिल्ल्यात धूळ चारून ही जागा ताब्यात घेण्याची भाजपची रणनीती होती. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून प्रभागातील राजकीय वातावरण तापले होते. त्यामुळे निकालाची उत्सुकता होती. दरम्यान, कोद्रे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्‍वर मुळीक यांनी जाहीर केले.

Web Title: Mundhva byelection NCP Pooja kodre Won