कार्यक्रमांमुळे वाढली कचऱ्याची डोकेदुखी; महापालिका प्रशासन हतबल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या दिवाळी पहाट आणि अन्य कार्यक्रमांमुळे कचरा साठत असल्याने महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे.

पुणे - एकीकडे शहरात "स्वच्छ भारत अभियान' राबवून त्याच्या स्पर्धेत आघाडी घेण्याचा प्रयत्न महापालिका करीत आहे. दुसरीकडे मात्र सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या दिवाळी पहाट आणि अन्य कार्यक्रमांमुळे कचरा साठत असल्याने महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे. कार्यक्रम घेताना कचरा करू नये, अशा सूचना देऊनही संस्थांकडून त्याचे पालन होत नसल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात आयोजकांविरोधात कारवाई कोणी आणि कशी करायची, हा प्रश्‍न महापालिका प्रशासनापुढे आहे. 

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात सहभागी झालेल्या महापालिकेने जोरदार तयारी केली आहे. मागील वर्षी या अभियानात अपयश आल्यानंतर यंदा मात्र बाजी मारण्यासाठी महापालिकेची धडपड सुरू आहे. त्यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण शहरातील गल्लीबोळांसह मोकळ्या जागांवरील स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. मात्र दिवाळीत विशेषत: उद्यानांत आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमुळे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत असल्याचे दिसून आला आहे. अशा ठिकाणच्या साफसफाईची जबाबदारीही आयोजन करणाऱ्या संस्थांची असते; परंतु तसे होत नसल्याचे आढळून आले आहे. 

स्वच्छ भारत अभियानाबाबत पुणेकरांकडून रोजच्या रोज अभिप्राय घेतला जात आहे. तेव्हाच वर्दळीच्या ठिकाणी मात्र अस्वच्छता होत असल्याने काय करायचे, असा प्रश्‍न महापालिकेला भेडसावतो आहे. 

सध्या दिवाळीतील कार्यक्रमांमुळे उद्यानांत कचरा जमा होत असल्याच्या तक्रारी आहेत. तो उचलण्यात येत आहे. मात्र त्याचा कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. त्यामुळे कचरा करू नये, अशा सूचना आयोजक संस्थांना केल्या आहेत. 
-ज्ञानेश्‍वर मोळक, प्रमुख, घनकचर व व्यवस्थापन विभाग, महापालिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal administration discourages due to garbage