पालिकेत घुमणार कामगार आव्वाज

पालिकेत घुमणार कामगार आव्वाज

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत टाटा मोटर्सच्या तीन व थरमॅक्‍स कंपनीमधील एक अशा एकूण चार कामगारांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे हे चारही कामगार बऱ्याच वर्षांपासून भाजपचे कट्टर कार्यकर्ते आहेत व ते आता भाजपच्याच तिकिटावर निवडून आले आहेत. 

एकनाथ पवार (प्रभाग ११), नामदेव ढाके (प्रभाग १७), बाबासाहेब त्रिभुवन (प्रभाग २७) व केशव घोळवे (प्रभाग १०) असे या नवनिर्वाचित नगरसेवकांची नावे आहेत. या चारही कामगारांचा बऱ्याच वर्षांपासून भाजप व कामगार चळवळीतील विविध मोर्चे आदींमध्ये सक्रिय सहभाग होता.
 

एकनाथ पवार - मूळगाव रामतीर्थ (जि. नांदेड) असून त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. आयटीआय शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९९० मध्ये ते टाटा माटर्समध्ये कामगार म्हणून रुजू झाले. विश्‍व हिंदू परिषद, नंतर १९९३ पासून भाजपचे काम सुरू केले. तसेच टाटा मोटर्स युनियन सरचिटणीस, युवामार्चा शहराध्यक्ष, भाजप शहराध्यक्ष, पश्‍चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख आदी पदे त्यांनी भूषविली. २०१२ मध्ये महापालिका निवडणूक २७ मतांनी हरले होते. त्यांना २०१४ मध्ये भोसरी विधानसभा निवडणुकीत महेश लांडगे यांच्या विरोधात पराभव पत्करावा लागला.

नामदेव ढाके - मूळगाव वराडसीम (जि. जळगाव) असून आयटीआय शिक्षणानंतर १९९१ मध्ये ते टाटा माटर्समध्ये रुजू झाले. १९९६ पासून त्यांनी 
विविध सामाजिक उपक्रम,
नागरी समस्या आदींच्या माध्यमातून समाजकार्याला सुरवात केली. 
भाजप कामगार आघाडी 
शहराध्यक्ष, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष, टाटा मोटर्स युनियन सरचिटणीस, प्रदेश कामगार आघाडी सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांचा २००७ मध्ये महापालिका निवडणुकीत पराभव झाला होता.
 

बाबा त्रिभुवन - मूळगाव सिंधफणा-चिंचोली (जि. बीड) असून लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले, त्यांचा सांभाळ आजी-आजोबांनी केला. गरीब परिस्थितीत त्यांनी आयटीआय शिक्षण पूर्ण केले. १९९५ मध्ये टाटा मोटर्समध्ये कायम झाले. गावाकडून आलेल्या मुलांना नोकरी शोधून देणे व राहण्याची सोय करून देणे, यामाध्यमातून समाजकार्याची सुरवात केली. काळेवाडी व रहाटणी येथील बुद्धविहार उभारण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. पुढे त्यांचा संपर्क एकनाथ पवार यांच्याशी आला व त्यांनी भाजपचे काम सुरू केले. 
 

केशव घोळवे - मूळगाव डाळज दोन (ता. इंदापूर, जि. पुणे) असून त्यांचे वडील ऊसतोडणी कामगार होते. आयटीआय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते १९८८ मध्ये थरमॅक्‍स कंपनीत वेल्डर म्हणून कामाला लागले. त्यांनी युनियनचे उपाध्यक्ष, सचिव व अध्यक्ष या पदांच्या माध्यमातून जागतिक व राष्ट्रीय कामगार परिषदेत सहभाग घेतला. २०१० पासून त्यांनी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध उपक्रमात काम करण्यास सुरवात केली. यंदाच्या निवडणुकीत अवघ्या १३५ मतांनी त्यांचा विजय झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com