पोकळे, जाधव, ढोरे यांचा विजय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

फुरसुंगी-लोहगाव प्रभागात निसटता पराभव
नव्या गावांत दोन्ही काँग्रेसची ताकद असल्याचे फुरसुंगी-लोहगाव प्रभागातील निकालांनतर दिसून आले आहे. येथील एक जागा राष्ट्रवादीने जिंकली तरी, दुसऱ्या जागेवरील महिला उमेदवारांना चांगली मते मिळाली आहेत. जेमतेम एक हजार मते भाजपला अधिक मिळाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा हा निसटता पराभव मानला जात आहे. या निकालामुळे राष्ट्रवादीच्या गोटात उत्साह निर्माण झाला आहे.

भाजपला दोन, तर राष्ट्रवादीला एक जागा
पुणे - महापालिकेच्या नव्या फुरसुंगी-लोहगावमधील (प्रभाग क्र.४२) निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली. या प्रभागातून राष्ट्रवादीचे गणेश ढोरे आणि भाजपच्या आश्‍विनी पोकळे हे निवडून आले. तर, धानोरी-कळस-विश्रांतवाडीमधील (प्रभाग क्र.१) पोटनिवडणुकीत भाजपच्या ऐश्‍वर्या जाधव विजयी झाल्या आहेत. 

गणेश ढोरे यांना २६ हजार ३०४ मते मिळाली असून शिवसेनेचे अमोल हरपळे यांना २० हजार २२४ मते मिळाली. ढोरे यांनी सहा हजार आठ मतांची आघाडी घेतली. पोकळे यांना २४ हजार ८५१ मते पडली असून त्यांनी कामठे यांचा ९३२ मतांनी पराभव केला.

कामठे यांना २३ हजार ९१९ मते मिळाली. धानोरी-कळस-विश्रांतवाडीतून ऐश्‍वर्या जाधव यांना सात हजार १०० मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेणुका चलवादी यांना चार हजार मते पडली. या प्रभागातील भाजपच्या किरण जठार यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने त्यातील एका गटासाठी पोटनिवडणूक झाली. येथील वंचित बहुजन आघाडीच्या रेहिणी टेकाडे यांना दोन हजार ९०० मते मिळाली. 

महापालिकेत समाविष्ट झालेल्या अकरा गावांच्या प्रभागातून दोन जागांसाठी निवडणूक झाली. त्यात भाजप-शिवसेना युती आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार रिंगणात होते. त्यातच या गावांत दोन्ही काँग्रेसला विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा मतदार असल्याने आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी राष्ट्रवादीच्याच चिन्हावर निवडणूक लढविली होती. तर शिवसेनेने हरपळे यांना पुरस्कृत केले होते. त्यामुळे निकालाबाबत उत्सुकता होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Byelection Result