"एसीबी'च्या जाळ्यातील "तो' अधिकारी सेवेत रुजू! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

पुणे - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या जाळ्यात रंगेहाथ सापडलेले महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दोन अधिकारी महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे पुन्हा सेवेत रुजू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. ही गंभीर बाब "सकाळ'ने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या निदर्शनास आणल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा त्यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले. 

पुणे - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या जाळ्यात रंगेहाथ सापडलेले महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दोन अधिकारी महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे पुन्हा सेवेत रुजू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. ही गंभीर बाब "सकाळ'ने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या निदर्शनास आणल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा त्यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले. 

रुग्णालयाच्या नोंदणी परवान्याच्या नूतनीकरणासाठी दहा हजारांची लाच स्वीकारताना महापालिकेचे दोन क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप जयराम धेंडे आणि आरोग्य निरीक्षक मधुकर निवृत्ती पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयात 13 मार्च रोजी रंगेहाथ पकडले होते. परंतु, त्यांच्यावर महापालिका प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई करण्यात दिरंगाई झाल्यामुळे डॉ. धेंडे पुन्हा सेवेत रुजू झाले. 

ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातील एका रुग्णालय चालकाकडे परवाना नूतनीकरणासाठी आवश्‍यक "ना हरकत प्रमाणपत्र' देण्यासाठी पाटील आणि डॉ. धेंडे यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे संबंधित तक्रारदाराने "एसीबी'कडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या पडताळणीसाठी एसीबीच्या पथकाने 13 मार्च रोजी सापळा रचला. त्यामध्ये दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्यांच्याविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्काळ निलंबन करून विभागांतर्गत चौकशी समिती नेमणे अपेक्षित होते. परंतु, महापालिकेच्या आरोग्य व सामान्य प्रशासनाकडून तातडीने कारवाई करण्याच्या दिरंगाईमुळे डॉ. धेंडे सेवेत रुजू झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात होते. 

एखाद्या महापालिकेच्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करणे हे आरोग्य विभागाच्या अखत्यारीत येत नाही. सामान्य प्रशासन विभागाने ही कारवाई करणे अपेक्षित आहे. 
- डॉ. अंजली साबणे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका 

सामान्य प्रशासन विभागाकडून महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यावर अंतिम आदेश मिळाल्यानंतर येत्या दोन दिवसांत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. 
- अनिल मुळे, उपआयुक्त, सामान्य प्रशासन विभाग 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून झालेल्या कारवाईनंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाकडून डॉ. संदीप धेंडे आणि मधुकर पाटील यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. 
- कुणाल कुमार, आयुक्त, पुणे महापालिका. 

Web Title: municipal commissioner Kunal Kumar pmc