पुणे : महापालिकेने ओलांडला सहा हजार कोटीचा उत्पन्न टप्पा

महापालिकेतर्फे नदी सुधार, मोठे रस्ते, उड्डाणपूल, वैद्यकीय महाविद्यालय असे मोठे प्रकल्प मार्गी लावले
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal

पुणे : पुणे महापालिकेने प्रथमच वर्षभरात सहा हजार कोटी रुपयांचा उत्पन्नाचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये प्रामुख्याने बांधकाम विभागाने २००२ कोटी, मिळकतकर विभागाने १८५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर जीएसटी पोटी शासनाकडून सुमारे १८०० कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

महापालिकेतर्फे नदी सुधार, नदी काठ सुधार, मोठे रस्ते, उड्डाणपूल, वैद्यकीय महाविद्यालय असे मोठे प्रकल्प मार्गी लावले आहेत. तर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह पीएमपी, शिक्षण मंडळातील कर्मचारी यांच्या सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी असे मोठे खर्च प्रशासनाला करावे लागणार होते. त्यामुळे पुणे महापालिकेतर्फे उत्पन्न वाढीसाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न केले जात होते. यामध्ये मोठा हातभार बांधकाम विभाग व मिळकतकर विभागाने लावला आहे.

बांधकाम विभागाने २०२१-२२ या वर्षामध्ये ११८५ कोटी रुपायांचे उत्पन्न निश्‍चीत केले होते. पण त्यापेक्षा जवळपास ८१५ कोटी रुपयांनी जास्त उत्पन्न गेल्या वर्षभरात मिळाले आहे. यामध्ये राज्य शासनाने प्रिमियम एफएफआयवर ५० टक्के सूट दिल्याने बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्याप्रमाणात प्रस्ताव दाखल केले होते. गेल्या वर्षभरात ६९८ नव्या प्रस्तावांसह २ हजार ७७५ बांधकाम प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. त्यामधून २००२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांसाठी पीएमआरडीएकडे जमा झालेले ३०० कोटी रुपये अद्याप महापालिकेला मिळालेले नाहीत. त्यासाठी पाठपुरावा केला जात आहे, असे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले.

मुख्य वित्त व लेखा अधिकारी उल्का कळसकर म्हणाल्या, ‘‘महापालिकेच्या उत्पन्नाचे सर्व आकडे अद्याप अंतिम झालेले नाहीत पण यंदा सहा हजार कोटी पर्यंत उत्पन्न मिळाले आहे.

मिळकतकराचे १८६ कोटीने उत्पन्न वाढले

महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे गेल्यावर्षीच्या तुलनेत १८६ कोटी रुपयांनी जास्त उत्पन्न मिळाले आहे. २०२१-२२ मध्ये १८५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर २०२०-२१ मध्ये १६६४ कोटीचे उत्पन्न मिळाले होते. यंदाच्या वर्षी महापालिकेने निवासी मिळकतींसाठी अभय योजना राबविण्यात आली. त्यामध्ये ४८ हजार ३०४ मिळकतींनी १०८.८३ कोटी रुपये वसूल करण्यात आले. बिगर निवासी मिळकतींना सील करण्याची व इतर कारवाईची मोहीम सुरू केल्याने त्यातून १२ हजार २६९ मिळकतींमधून १८६.४० कोटी रुपये मिळाले आहेत. तर एप्रिल व मे या दोन महिन्यात ५ ते १० टक्के सूट दिल्याने ५. ८ लाख मिळकतधारकांनी ७४५.४१ रुपये जमा केले होते. गेल्या वर्षभरात ७१ हजार २२० नव्या मिळकतींची नोंद झाली असून, त्यातून २७६.७९ कोटी तर २३ गावातील ४५ हजार २८९ मिळकतीच्या नोंदणीतून ३९ कोटी रुपये मिळाले आहेत. पुढील वर्षी २१०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट असल्याने त्यासाठी तयारी सुरू केल्याचे मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com