पुण्याचा कारभारी आज ठरणार 

Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporation

पुणे - महापालिका निकालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, पुण्याचा नवा कारभारी कोण? याचा फैसला आजच्या (ता. 23) मतमोजणीमध्ये होणार आहे. पहिला निकाल दुपारी साडेबारा वाजेपर्यंत लागण्याची शक्‍यता असून, सायंकाळी पाच वाजेपर्यंत संपूर्ण निकालाचे चित्र स्पष्ट होईल. 

निकालासाठीची संपूर्ण प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. महापालिकेतील 162 जागांसाठी 27 जानेवारीपासून सुरू झालेल्या निवडणूक प्रक्रियेतील शेवटचा महत्त्वाचा टप्पा उद्या पार पडत आहे. त्यात सुमारे एक हजार 107 उमेदवारांचे भवितव्य इलेट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) बंद झाले आहे. शहरातील 14 ठिकाणी मतमोजणी होणार आहे. महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदान साडेचार टक्‍क्‍यांनी वाढून 55.50 टक्‍क्‍यांवर पोचले. जादा झालेले मतदान आणि नवमतदारांची पसंती कोणाला मिळणार, यावर महापालिकेतील सत्तेचे गणित अवलंबून असेल. 

गेली 15 वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीकडे महापालिकेची सत्ता आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत तसेच नुकत्याच झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीतही असेच यश मिळण्याची भाजपला अपेक्षा आहे. पुणे महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी भाजपने यंदा शर्थीने प्रयत्न केले आहेत. प्रचारासाठी केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांच्यासह अनेक मंत्री; तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी, पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी शहरात आले होते. तर, सत्ता राखण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आदी नेत्यांनी शहरात तळ ठोकला होता. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि इतर नेत्यांशिवाय शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही शहरात दौरा केला होता. त्यामुळे महापालिकेत भाजप-शिवसेनेची युती सत्तेवर येणार का, राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसची आघाडी सत्ता कायम राखणार, याबद्दल कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्येही औत्सुक्‍य निर्माण झाले आहे. मतदानोत्तर व्यक्त करण्यात आलेले कौल पुण्यात कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने नसल्याने सत्ता कोणाकडे जाणार याबाबत उत्कंठा आहे. 

या निवडणुकीत नोटाबंदीसह शहराच्या विकासाशी संबंधित प्रश्‍नांचे मुद्दे प्रचारात गाजले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या सभेला मिळालेला शहरातील "प्रतिसाद'ही चर्चेचा विषय ठरला होता. त्याशिवाय निवडणुकीच्या निमित्ताने होणाऱ्या पक्षांतराचीही चर्चा यंदाही झाली. 

शिवसेना-कॉंग्रेसभोवती फिरणार सत्ताकेंद्र? 
पुण्यात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्‍यता नसल्याचे राजकीय विश्‍लेषकांचे मत असल्याने निकालानंतर शिवसेना आणि कॉंग्रेस या पक्षांभोवती सत्ताकेंद्र फिरणार असल्याची चर्चा आहे. शिवसेना किती जागा घेणार याबाबत प्रचंड उत्सुकता असून, निवडणुकीनंतर ते पुन्हा भाजपसोबत युती करणार की नाही; हे मुंबईच्या निकालावर ठरेल, असेही सांगितले जात आहे. कॉंग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची भूमिका महापौर निवडीत निर्णायक ठरणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com