महापालिका, महामेट्रोला समान वाटा 

महापालिका, महामेट्रोला समान वाटा 

पुणे - मेट्रो मार्गालगतच्या टीओडी झोनमधून (ट्रान्झिट ओरिएंटेड झोन) मिळणाऱ्या प्रीमिअमच्या रकमेतून महापालिकेला आणि महामेट्रोला प्रत्येकी पन्नास टक्के वाटा देण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे. दुसरीकडे प्रीमिअमपोटी जमा रकमेच्या 75 टक्के महापालिकेला व उर्वरित 25 टक्के महामेट्रोला द्यावी, असा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारकडे दिला. त्यावर सरकार कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पुणे महापालिकेने मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. निधीसाठी मेट्रो स्टेशनभोवती पाचशे मीटरच्या परिसरात टीओडी झोन दर्शविला आहे. यामध्ये प्रीमिअम आकारून मान्य एफएसआयव्यतिरिक्त वाढीव एफएसआय वापरण्यास परवानगी दिली. मात्र, त्यासाठी निवासी बांधकाम असेल, तर त्यासाठी रेडी-रेकनरमधील दराच्या साठ टक्के व बिगर निवासी असेल, तर रेडी-रेकनरमधील जमिनीच्या दराच्या 75 टक्के शुल्क आकारण्यास परवानगी दिली. मात्र, त्यातून जमा होणाऱ्या रकमेपैकी महापालिका आणि महामेट्रो यांचा वाटा किती असावा, याबाबतचा निर्णय निश्‍चित झालेला नाही. 

दरम्यान, राज्य सरकारच्या नगरविकास खात्याचे प्रधान सचिव नितीन करीर एका कार्यक्रमासाठी शनिवारी पुण्यात आले होते. त्या वेळी या संदर्भात त्यांची महापालिका आयुक्तांबरोबरच बैठक झाली. त्यामध्ये टीओडी झोनमधील प्रीमिअममधून मिळणाऱ्या रकमेतून महापालिका आणि महामेट्रोचा किती वाटा असावा, यावर चर्चा झाली. याबाबत लवकरच निर्णय होईल, असे करीर यांनी सांगितले. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता नागपूरच्या धर्तीवर पुणे महापालिकेतदेखील पन्नास टक्‍क्‍यांचे धोरण लागू करण्याचा सरकारचा विचार आहे. पुणे महापालिकेने एकूण रकमेच्या 75 टक्के रक्कम स्वतःकडे, तर 25 टक्के रक्कम महामेट्रोला देण्याच्या प्रस्ताव सादर केला आहे. त्यावर सरकार जो निर्णय घेईल, त्यांची अंमलबजावणी करावी लागणार आहे, असे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या बोलीवर सांगितले. 

लोकप्रतिनिधी बैठकीस गैरहजर 
महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाशी निगडित हा विषय आहे, त्यामुळे निर्णयास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता आवश्‍यक आहे. परंतु राज्य सरकारचे नगरविकास खाते आणि पुणे महापालिकेचे प्रशासन यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीला लोकप्रतिनिधी उपस्थित नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे यावरून महापालिकेच्या वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com