
PMC : क्षमता तपासून होणार रस्ता डांबरीकरण!
पुणे : शहरातील रस्ते दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने फॉलिंग वेट डिप्लेक्टोमीटर (एफडब्ल्यूडी) या तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ता किती खराब झाला आहे याचा अभ्यास करून व किती क्षमतेचा रस्ता तयार करणे आवश्यक आहे हे तपासूनच डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. हे तंत्रज्ञान वापराचे महापालिकेच्या अभियंत्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पुढील काही महिन्यात १४० किलोमीटरचे रस्त्यांवर डांबरीकरण केले जाणार आहे, त्यावेळी हे तंत्रज्ञान वापरातून चांगल्या दर्जाची रस्ते करता येतील असा दावा प्रशासनाने केला आहे.गेल्या दोन वर्षापासून शहरात समान पाणीपुरवठा योजना, सांडपाणी वाहिन्या, मोबाईल कंपनी, महावितरण, गॅस वाहिनी आदी कारणासाठी खोदकाम सुरू होते.
त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांसह सर्वच भागात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले. त्याच पुणेकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. नागरिकांनी टीकेची झोड उठवल्याने व २०२३ मध्ये होणाऱ्या ‘जी २०’ परिषदेमुळे शहरातील रस्ते सुस्थितीत आणणे आवश्यक आहे. पथ विभागाने पहिल्या टप्प्यात १०९.८ किलोमीटर लांबीचे रस्त्याची कामे तर दुसऱ्या टप्प्यात ४२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सुमारे ३०० कोटी रुपये खर्च केला जाईल. हे डांबरीकरण करताना तांत्रिक परीक्षण केले जाणार आहे. फॉलिंग वेट डिप्लेक्टोमीटर (एफडब्ल्यूडी) या नवीन पद्धतीच्या रस्ते तपासणी यंत्राचा वापर केला जाणार आहे.
असा होता तंत्रज्ञानाचा वापर
- ‘एफडब्ल्यूडी’ हे तंत्रज्ञान चारचाकीत लावले जाते.
- डांबरी रस्त्याची सध्याची स्थिती, क्षमता तसेच वापरलेल्या थराची क्षमता तपासली जाते
- बसणाऱ्या हदऱ्यावरून नव्याने डांबराचा थर किती जाडीचा टाकायचा हे ठरते
- वाहन चालविण्याची क्षमता (राइड क्वालिटी) तपासण्यासाठी बंप इंटिग्रेटर यंत्रणेचा वापर होणार
- त्यामुळे रस्त्याची कामापूर्वीची स्थिती आणि कामानंतरची स्थिती याची तपासता येणार आहे
‘‘या तंत्रज्ञानामुळे भारतीय रस्ते कॉंग्रेस (आयआरसी) च्या मानांकनानुसार रस्त्याचा दर्जा राखणे यामुळे शक्य होणार आहे. कॉंक्रिटच्या रस्त्यांसाठी व्हाइट टॉपिंगसाठी बेन्कलमन बीम यंत्रणेचा वापर केला जाईल. या तांत्रिक परीक्षणाचे प्रशिक्षण पथ विभागाच्या अभियंत्यांना देण्यात आले आहे.’’
- साहेबराव दांडगे, अधिक्षक अभियंता, पथ विभाग