सोसायट्यांत पालिकेचा पैसा

सोसायट्यांत पालिकेचा पैसा

पुणे - खासगी सोसायट्यांमध्ये पुणे महापालिकेचा निधी वापरण्यास प्रतिबंध आहे. मात्र, नगरसेवकांकडून या कायदेशीर तरतुदीला हरताळ फासला जात आहे. स्थायी समितीच्या बैठकीत चक्‍क सोसायट्यांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी तब्बल २५ लाख रुपयांचे वर्गीकरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

स्थायी समितीच्या बैठकीमध्ये शहराच्या नियोजनबद्ध विकासापेक्षा अंदाजपत्रकातील तरतुदींची तोडफोडच जोरदार सुरू आहे. गेल्या काही बैठकांमध्ये कोट्यवधींची वर्गीकरणे मंजूर केली आहेत. २०१९-२०च्या अंदाजपत्रकात प्रभात रस्ता, कर्वे रस्ता भागातील प्रभाग क्रमांक १३ ब मध्ये विविध सुधारणा करणे, या शीर्षकाखाली २५ लाख रुपयांची तरतूद केली होती. हा निधी नेमका कोठे व कोणत्या कामासाठी खर्च केला जाणार होता, याबाबत स्पष्टता नव्हती. त्यामुळे ही २५ लाखांची तरतूद खर्ची पाडण्यासाठी प्रभाग क्रमांक १३ ब मधील विविध सोसायट्यांच्या इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी वापरता यावा, यासाठी वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी स्थायी समितीला दिला होता. महापालिकेच्या नियमानुसार महापालिकेला कोणत्याही खासगी जागेमध्ये विकासकामे करता येत नाहीत. ही कामे महापालिकेच्याच जागेत करणे आवश्‍यक आहे. मात्र, स्थायी समितीच्या बैठकीत वर्गीकरणाचा सपाटा सुरू असताना प्रशासनाचा अभिप्राय न घेता अशा पद्धतीने वर्गीकरण करण्यात आल्याचे समोर आले आहे. 

निर्णयात विरोधाभास 
एकीकडे सोसायट्यांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी वर्गीकरणाद्वारे २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले. मात्र, त्याच वेळेला प्रत्येक नगरसेवकाला ‘स’ यादीतून व वॉर्डस्तरीय निधीतून रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी १० लाख रुपये खर्च करण्यास परवानगी देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली. यावरून स्थायी समितीतील निर्णयांमधील विरोधाभास समोर आला आहे. नगरसेवक जयंत भावे, महेश वाबळे यांनी हा प्रस्ताव दिला होता.

हा प्रस्ताव मंजूर केला असला, तरी याबाबत प्रशासनाला योग्य पद्धतीने त्याचा वापर करावा, यासाठी सूचना दिल्या जातील. 
- सुनील कांबळे, अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महापालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com