चमकोगिरीसाठी कमानी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

पुणे - प्रभागांमधील रस्ते आणि चौकांमध्ये प्रवेशद्वार (कमानी) न उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचा असतानाही, महत्त्वाच्या कामांचा निधी वळवून काही नगरसेवक प्रवेशद्वाराला प्राधान्य देत असल्याचे स्थायी समितीकडील प्रस्तावांच्या संख्येवरून दिसून आले आहे. प्रवेशद्वार म्हणजे विकासकाम नसल्याचा अभिप्राय प्रशासनाने देऊनही त्यावर पैशाची उधळपट्टी होत आहे.

प्रभागांच्या हद्दी आणि प्रवेशद्वारांच्या नियोजनामुळे नगरसेवकांमध्ये वादाच्या घटनाही घडल्या आहेत. प्रवेशद्वारावर आपल्या नावाचा उल्लेख करीत ‘चमकोगिरी’च्या उद्देशाने त्या उभारल्या जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे एकाच प्रभागातून दोन ते तीन प्रवेशद्वारांचे प्रस्ताव येतात.

त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी वापरण्यात आला आहे; परंतु प्रवेशद्वार आणि त्यावरील नावांमुळे राजकीय संघर्षही होत आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्याचे पडसाद उमटल्यानंतर या बाबतच्या प्रस्तावांना प्रशासनाने विरोध केला. गरज नसतानाही प्रवेशद्वार उभारण्यात येत असल्याचे सांगून, त्या न उभारण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने सन २००८-९ मध्ये घेतला. या कामांसाठी निधी देण्यात येणार नसल्याचे तेव्हा जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर सुरवातीच्या काही महिने निर्णयाची अंमलबजावणी झाली. मात्र, निर्णयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत, प्रवेशद्वार उभारण्यासाठी लाखो रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

यासाठी वर्गीकरणाचे प्रस्तावही स्थायी समितीकडून मंजूर होत आहेत. त्यामुळे अनावश्‍यक कामांच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

‘‘प्रवेशद्वार उभारले जाऊ नये, असा निर्णय आहे. त्याची अंमलबजावणी होत आहे,’’ महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांनी सांगितले.

आवश्‍यक त्या कामांच्या वर्गीकरणाचे प्रस्ताव मंजूर केले जातील. प्रवेशद्वार आणि त्याबाबतचे धोरण तपासून निर्णय घेऊ; परंतु अनावश्‍यक कामांवर खर्च करू नये.
- योगेश मुळीक, अध्यक्ष, स्थायी समिती   

Web Title: municipal corporator entry gate