कोरेगाव पार्क वगळता सर्वत्र रांगा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

पन्नास टक्के मतदान; मुंढव्यात यंत्रात बिघाड

पन्नास टक्के मतदान; मुंढव्यात यंत्रात बिघाड
पुणे - आपापल्या घराजवळच्या मतदान केंद्रांवर कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींबरोबर हजेरी लावत, हडपसर, सातववाडी, गोंधळेनगर, मुंढवा, मगरपट्टा सिटी, कोरेगाव पार्क आणि घोरपडी परिसरातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हडपसर क्षेत्रीय कार्यालयातर्गंत तिन्ही प्रभागांमधील कोरेगाव पार्कचा अपवाद वगळता सर्व केंद्रांवर सकाळी मतदारांच्या रांगा होत्या. या भागांत सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत साधारणत: 50 टक्के मतदान झाले.

हडपसर परिसरातील दोन मतदान केंद्रांबाहेर गोंधळाच्या घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली. मुंढव्यात एका मतदान केंद्रावर मतदान यंत्रात किरकोळ बिघाड झाल्याने गोंधळ झाला. त्यानंतर लगेचच मतदान सुरळीत सुरू झाले.

हडपसर गावठाण-सातववाडी (प्रभाग क्र. 23), मुंढवा-मगरपट्टा सिटी (प्रभाग 22) आणि कोरेगाव पार्क-घोरपडी या प्रभागांकरिता सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. तेव्हापासून या केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, महिला आणि नवमतदारांच्या रांगा लागल्या होत्या. बहुभाषिक मतदार असलेल्या कोरेगाव पार्कमधील केंद्रांवर मात्र मतदारांचा फारसा उत्साह दिसून आला नाही. दुसरीकडे, त्या-त्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते नागरिकांना मतदानासाठी केंद्रावर आणण्यासाठी घरोघरी जात होते. माजी महापौर वैशाली बनकर, चंचला कोद्रे, राजलक्ष्मी भोसले यांनी सकाळीच आपल्या कुटुंबीयांसह मतदान केले. पाठोपाठ माजी उपमहापौर बंडू गायकवाड, चेतन तुपे यांनी मतदान केले.

या तिन्ही प्रभागांमध्ये पहिल्या दोन तासांत म्हणजे, साडेनऊपर्यंत नऊ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यानंतरही केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा होत्या. साडेअकरापर्यत 18 टक्के इतके मतदान झाले. उन्हाचा चटका वाढला असतानाही बारानंतर अनेक जण घराबाहेर पडत होते. दुपारी दीडपर्यंत 29 टक्के मतदानाची नोंद झाली. भरदुपारी मात्र, काही केंद्रांबाहेरील मतदारांच्या रांगा कमी झाल्याचे जाणवत होते.

साडेतीनपर्यंत 40 टक्के मतदान झाले. मुंढवा, सातववाडी, गोंधळेनगर, मगरपट्टा सिटी, घोरपडी परिसरातील मतदान केंद्रांवर मतदारांच्या सायंकाळी सहापर्यंत रांगा होत्या.

कार्यकर्त्यांकडून मदत
राजकीय कार्यकर्ते मतदानासाठी येणाऱ्यांची नावे, अनुक्रमांक शोधण्यासाठी मदत करीत होते. त्याकरिता केंद्रावर जागोजागी मांडव टाकून कार्यकर्ते सकाळपासून ठाण मांडून होते. आपल्या उमेदवाराला मत देण्याचा निरोप देण्यास कार्यकर्ते विसरत नव्हते.

Web Title: municipal election pune