‘हैं तैयार हम!’

‘हैं तैयार हम!’

पुणे - ‘नव्या दिशेचे, नव्या उषेचे गीत सूर हे गाती... या मंगल देशाचे आहे भविष्य आमुच्या हाती...’ अशा कधीकाळी शाळेत म्हटल्या गेलेल्या समूहगीतांत जागवली गेलेली देशभक्ती पुढे ‘कॉलेज गोईंग’ वगैरे झाल्यावर कित्येक जण खरंच टिकवितात का, असा प्रश्‍न अनेकदा विचारला जातही असेल कदाचित; पण, मंगळवारी मात्र या प्रश्‍नाचं उत्तर खूप प्रमाणात ‘पॉझिटिव्ह’ असल्याचंच पाहायला मिळालं. लोकशाही व्यवस्थेने आपल्याला मिळवून दिलेला मतदानाचा हक्क हक्काने बजाविण्यासाठी शहरभर सर्वत्र तरुणाई रस्त्यांवर अन्‌ मतदान केंद्रांवर उतरल्याचं पाहायला मिळालं. ‘हैं तैयार हम !’ म्हणत या ‘नेक्‍स्ट जनरेशन’ने समाजबदलाची एक हाकच जणू दिली...

मनापासून एन्जॉय
मंगळवारचा दिवस एरवीच्या दिवसांपेक्षा वेगळा होता. महापालिका निवडणुकांचा मतदानाचा दिवस असलेल्या या दिवसाने एरवी ‘सिस्टीम’मधल्या उणिवांवरच रात्रंदिन कमेन्ट्‌सचा ‘सोशल’ पाऊस पाडणाऱ्या या युवा शिलेदारांना चक्कं सकाळी-सकाळी रस्त्यावर आणलं होतं. अर्थात, लोकशाहीचा हा निवडणुकोत्सव मनापासून एन्जॉय करत या नव्या पिढीतल्या मतदारांनी आपलं कर्तव्य पुरेपूर बजावलं, हे खरंच.

ॲप वापरण्याचं ट्रेनिंग!
कुणी आपल्या जिगरी दोस्तांच्या ग्रुपसोबत, तर कुणी आपल्या कुटुंबीयांसोबत, कुणी एकटं, तर कुणी आपल्या जोडीदारासह मतदानाला आल्याचं पाहायला मिळत होतं. सकाळी सातपासूनच तरुणांनी आपलं अस्तित्व मतदान केंद्रांभोवती ठसठशीतपणे अधोरेखित करायला सुरवात केली होती. उमेदवारांचे बूथ सांभाळणारे युवा कार्यकर्ते, मतदारांना मदतीसाठी खास ठिकठिकाणी उपस्थित असलेले विविध समाजसेवी संघटनांचे युवा प्रतिनिधी, पोलिसांमधील युवा वर्ग हेदेखील जोडीला मिळाल्यामुळे अनेक ठिकाणी ज्येष्ठांच्या बरोबरीने हे मतदान भविष्यवेधी अशा तरुणाईमुळेही घडत असल्याचं वेळोवेळी जाणवून येत होतं. अनेकांनी तर ज्येष्ठांच्या मदतीला येत ‘मी आहे ना’, म्हणत मतदानासंबंधीचं ॲप वापरण्याचं छोटेखानी ट्रेनिंगही देऊ केलं. 

सेल्फी अन्‌ ‘डीपी’
सकाळी-सकाळी जॉगिंगला जाणारे तरुण, कोचिंग क्‍लासेसला जाणाऱ्या तरुणींचा गट, आयटी क्षेत्रातले तरुण, खेळाडू... एवढंच नाही, तर छोट्या अन्‌ मोठ्या पडद्यावर अलीकडे आपल्या अभिनयाद्वारे गाजणारी काही युवा नावं आणि युवा गायक-गायिकाही मतदानासाठी बाहेर पडले होते. ज्यांना सकाळची वेळ साधणं जमलं नाही, ते दुपारी किंवा मग सायंकाळी उन्हं कलल्यावर मतदान संपण्याच्या आधी जाऊन मतदान करून आले. विशेष म्हणजे, ‘आम्ही मतदान केलं’ आणि ‘तुम्हीही मतदान करा’, हे सांगण्यासाठीची उत्सुकताही अनेकांत दिसून येत होती. फेसबुकवर अपलोड झालेले सेल्फी आणि व्हॉट्‌सॲपचे बदललेले ‘डीपी’ यावरूनही तरुणाईने आपण मतदान केल्यांचं जाहीर केल्याचं दिवसभर पाहायला 
मिळत होतं.

इथेही जनरेशन गॅप!
मतदान करायला हवं, त्यातून चांगलं काही घडतं; असं मानून आपलं आयुष्य काढलेली मागची पिढी... आणि मतदान करावं की करू नये, याबद्दल दोन टोकाच्या ध्रुवांवरून विचार करणारी नवी पिढी असं चित्रही काही ठिकाणी पाहायला मिळालं. काही तरुण मतदानाच्या थेट विरोधात नसले तरीही, सध्याच्या काळातली उमेदवारांची ‘यत्ता’ हा मात्र त्यांच्या चिंतेचा विषय असल्याचं दिसून आलं. त्यातूनच मग एके ठिकाणी आपल्या आईसोबत मतदानाला आलेल्या एका तरुणीने आईशी भांडत मोठ्या हट्टाने आपण मतदान करू, पण ‘नोटा’चा हक्क बजावूनच; असं म्हणत कुणालाही मत न देता हक्क बजाविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com