भाजपमध्ये इनकमिंगला ‘ब्रेक’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

पुणे - आगामी महापालिकेसाठी इतर पक्षांतून नगरसेवक, कार्यकर्त्यांची खेचाखेची करण्यासाठी भारतीय जनता पक्षातील तीन नेत्यांची स्पर्धा सुरू असली तरी, पक्ष संघटनेने ‘लाल दिवा’ दाखविल्यामुळे अनेक प्रवेश रखडले आहेत. 

पुणे - आगामी महापालिकेसाठी इतर पक्षांतून नगरसेवक, कार्यकर्त्यांची खेचाखेची करण्यासाठी भारतीय जनता पक्षातील तीन नेत्यांची स्पर्धा सुरू असली तरी, पक्ष संघटनेने ‘लाल दिवा’ दाखविल्यामुळे अनेक प्रवेश रखडले आहेत. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून काही नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय काकडे, महापालिकेतील पक्षाचे गटनेते गणेश बिडकर त्यासाठी प्रयत्नशील आहेत. अन्य पक्षांतून भाजपमध्ये येण्याच्या तीन घटना नुकत्याच झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी मान्यता दिल्यामुळे पक्षप्रवेश झाल्याचे सांगण्यात येत होते; परंतु या प्रवेशांदरम्यान काही जणांच्या नावांवरून खासदार अनिल शिरोळे, बापट आणि काकडे यांच्यात मतभेद झाल्याची चर्चा आहे. अन्य पक्षांतून भाजपमध्ये घेताना पक्षाचे स्थानिक आमदार, पक्ष संघटना यांना विश्‍वासात घेतले गेले नव्हते, असेही त्या दरम्यान उघड झाले आहे. ही बाब पक्ष संघटनेने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणली. तसेच 

काही संभाव्य प्रवेशही रोखून धरले आहेत. परस्पर कोणत्याही प्रवेशाला मंजुरी देऊ नये, असे साकडेही त्यांनी नेत्यांना घातले आहे. 

या पार्श्‍वभूमीवर दानवे व मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांनुसार शहरातील भाजपच्या नेत्यांची नुकतीच बैठक झाली. त्यात मतभेद मिटवून पक्षप्रवेशांबाबत समन्वयाने निर्णय करण्याचे ठरल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. 

पक्ष संघटनाच प्रवेश ठरविणार 
कोणत्याही राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घ्यायचे असल्यास शहराध्यक्ष, पालकमंत्री, खासदार आणि स्थानिक आमदारांशी चर्चा करण्याचे भाजपने ठरविले आहे. पक्ष संघटनेने मंजुरी दिली तरच पक्षात प्रवेश द्यायचा, असे शहरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरले आहे. तसेच, पक्षात प्रवेश दिल्यास उमेदवारी निश्‍चित आहे, असेही कोणी समजू नये, असे भाजपच्या अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: municipal election in pune by bjp