पहिला निकाल साडेबारा वाजता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

प्रशासकीय यंत्रणा सज्ज; सायंकाळी सातपर्यंत सर्व निकाल येणार हाती

पुणे - महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीकरिता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, ४१ प्रभागांची गुरुवारी (ता. २३) सकाळी दहा वाजल्यापासून १४ ठिकाणी मतमोजणीला सुरवात होईल. दुपारी साडेबारा वाजता पहिला निकाल जाहीर होण्याची शक्‍यता आहे. सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्व जागांचे निकाल जाहीर होतील. 

प्रशासकीय यंत्रणा सज्ज; सायंकाळी सातपर्यंत सर्व निकाल येणार हाती

पुणे - महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीकरिता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, ४१ प्रभागांची गुरुवारी (ता. २३) सकाळी दहा वाजल्यापासून १४ ठिकाणी मतमोजणीला सुरवात होईल. दुपारी साडेबारा वाजता पहिला निकाल जाहीर होण्याची शक्‍यता आहे. सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्व जागांचे निकाल जाहीर होतील. 

संवेदनशील मतमोजणी केंद्रांवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ज्या प्रभागांमध्ये सर्वाधिक उमेदवार आहेत, त्या प्रभागांमधील मतमोजणी प्राधान्याने करण्यात येईल. मात्र, मतमोजणी कोणत्या प्रभागांमधील घ्यावयाची आहे, याचे अधिकार त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे असतील. त्यानुसार आधी जाहीर करून मतमोजणीला सुरवात होईल. उमेदवारांच्या संख्येनुसार मतमोजणीच्या फेऱ्या होतील, असे महापालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.

अशी होईल मतमोजणी 
प्रभागांमधील मतदान केंद्रांच्या संख्येइतकी मतदान यंत्रे असून, मतदान झाल्यानंतर ते ‘सील’ केले आहे. मतमोजणी सुरू झाल्यानंतर प्रत्येक टेबलवर एक मतदान यंत्र ठेवण्यात येईल. त्यानंतर उमदेवारांचा प्रतिनिधी, पर्यवेक्षक आणि मतमोजणी सहायक यांना यंत्रावरील ‘सील’ दाखवून ते काढण्यात येईल. त्याबाबतची खात्रीही उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून केली जाईल. यंत्रावरील ‘रिझल्ट १’ हे बटण दाबल्यानंतर त्या-त्या प्रभागांमधील संबंधित केंद्रांवर झालेल्या एकूण मतदानाचा आकडा दिसेल. त्यानंतर प्रभागातील चारही गटांतील उमेदवारांना मिळालेली मते यंत्राच्या ‘स्क्रीन’वर दिसतील. तेही उमेदवारांच्या प्रतिनिधींना दाखविण्यात येईल. संबंधित उमेदवारांच्या नावावर मतांची नोंदणी करून, त्या फेरीतील मतांचा आकडा जाहीर करण्यात येईल. सर्व टेबल यंत्रातील मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर त्या प्रभागातील एक फेरी होईल. 

सावरकर भवनात मध्यवर्ती केंद्र
मतमोजणी केंद्रांच्या बाहेर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत. मतमोजणी केंद्रांच्या परिसरात त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. मात्र, प्रत्येक प्रभागातील निकाल जाहीर होताच, तो त्यांच्यापर्यंत पोचविण्याची व्यवस्था करण्यात येईल. त्याकरिता केंद्रांबाहेर ध्वनिवर्धक लावण्यात आले आहेत. तसेच महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात म्हणजे सावरकर भवनात मध्यवर्ती केंद्र सुरू केले आहे. त्यातून त्या त्या केंद्रावरील निकाल जाहीर केले जाणार आहेत, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

मतमोजणीच्या पाच ते सात फेऱ्या
सकाळी दहा वाजता प्रभागांमधील उमेदवार, तेथील राजकीय स्थिती लक्षात घेऊन मतमोजणी केली जाईल. कोणत्या प्रभागामधील मतमोजणी सुरवातीला करायची याचा अधिकार संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आहे. प्रत्येक प्रभागात उमेदवारांच्या संख्येनुसार किमान पाच ते सात फेऱ्या होतील. ज्या प्रभागात उमेदवार अधिक असतील, तेथे मतमोजणीच्या किमान फेऱ्या होतील, असेही सांगण्यात आले.

अशी असेल केंद्रावरील रचना
सर्व मतमोजणी केंद्रांवर चोख व्यवस्था 
सुमारे १ हजार ७० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक. यात मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक अधिकारी, देखरेख अधिकाऱ्यांचा समावेश
प्रभागातील उमेदवारांची संख्या आणि मतमोजणी केंद्रातील जागा लक्षात घेऊन टेबल मांडणी
एका प्रभागातील मतमोजणीकरिता १४ ते २० टेबल
प्रत्येक टेबलसाठी उमेदवारांचा एक प्रतिनिधी (पोलिंग एजंट)
चारही उमेदवार एकाच पक्षाचे असल्यास त्‍या सर्वांसाठी एकच प्रतिनिधी नेमण्याचे आवाहन

प्रभागांमधील राजकीय स्थिती, तेथील उमेदवार आणि निकालानंतर संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्येक केंद्रावर पोलिस असतील. ध्वनिवर्धकाच्या माध्यमातून निकाल केंद्राबाहेरील लोकांपर्यंत पोचविण्यात येणार आहे. एका प्रभागातील चारही गटांची मतमोजणी एकाच वेळी केली जाईल.
- सतीश कुलकर्णी, निवडणूक निर्णय अधिकारी

Web Title: municipal election result