'धनुष्यबाणा'ला ओढ "इंजिना'ची !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

पुणे - शिवसेना- भाजप युती होणार की नाही, याबाबत एकीकडे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना, दुसरीकडे मात्र शिवसेना जुन्या मित्रपक्षाशिवाय अन्य पर्याय शोधत असल्याचे समजते. त्यासाठी जवळचे नाते सांगणाऱ्या मनसेबरोबरच गळ्यात गळा घालता येईल का, अथवा युती न करता परस्परपूरक भूमिका घेता येईल का, याची चाचपणी सुरू असून, त्यादृष्टीने दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये संपर्क सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना- भाजप दोन्ही पक्ष स्वबळावर लढले. मात्र, त्यानंतर सत्तेत ते एकत्र आले. असे असले तरी या दोन्ही पक्षांतील वाद मात्र मिटत नाहीत.

त्यामुळे नगरपालिका निवडणुका दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढल्या आहेत. नगरपालिकांच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात भाजपला चांगले यश मिळाले, त्यामुळे या पक्षात स्वबळाची भाषा जोरात सुरू झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात युती व्हावी, अशी भूमिका असलेली मंडळी दोन्ही पक्षांमध्ये आहेत. परंतु, इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे युती करू नये, याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर मोठा दबाव आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये युती होणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. पुण्याबरोबरच मुंबई महापालिकेची देखील निवडणूक होत आहे. मुंबईत युती होईल की नाही, यावर राज्यातील युतीचे भवितव्य ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

भाजपचे नेते युतीची भाषा बोलत आहेत. प्रत्यक्षात कृतीत ते दिसत नाही. मित्रपक्षाची ही खेळविण्याची पद्धत माहिती झाल्याने शिवसेनेने यंदा मात्र गाफील राहायचे नाही, हे ठरविले आहे. त्यासाठी अन्य पर्यायही खुले ठेवले आहेत. त्यामुळेच भाजपशी युती करण्याबरोबरच स्थानिक पातळीवर मनसेबरोबर मैत्री करता येईल का, याबाबत शिवसेनेच्या काही नेत्यांकडून चाचपणी सुरू झाली आहे. याबाबत दोन्ही पक्षांच्या काही वरिष्ठ नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाली असल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

अधिकृत युती परस्परांना पूरक
भाजपच्या तुलनेत मनसेचे सर्वजण पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच आहेत, त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संवाद अधिक सुलभपणे होऊ शकतो, असे कारण त्यामागे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अधिकृत युती झाली नाही, तर परस्परांना पूरक ठरेल, अशी रणनीती आखणे शक्‍य होऊ शकते, अशी चर्चा या बैठकीत झाल्याचे समजते. त्यामुळे कमळाबाईची साथ सोडून धनुष्यबाण इंजिनमध्ये बसणार का, याचे उत्तर येणारा काळच देणार आहे.

Web Title: municipal election shivsena & mns