मैदानांवर तळीरामांचा अड्डा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

हडपसर - महापालिकेची मोकळी मैदाने व रामटेकडी, महंमदवाडी येथील वन विभागाच्या टेकड्यांचा परिसर तळीरामांसाठी दारूचा अड्डा बनला असून, दररोज या परिसरात मद्यपीच्या ओल्या पार्ट्या होत आहेत. महापालिका, पोलिस प्रशासन आणि वन विभाग मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

या परिसरातील टेकड्या निर्जन आहेत. तसेच रात्रीच्या वेळी महापालिकेच्या मोकळ्या मैदानावर सुरक्षारक्षक नसतात. दोन्ही टेकड्यांवर मोठ्या प्रमाणावर विस्तीर्ण वनक्षेत्र आहे. वनक्षेत्रात हरणे, ससे मोठ्या संख्येने आहेत. मात्र या ठिकाणी वनविभागाचे कर्मचारी कधीच गस्त घालताना दिसत नाहीत. याचाच फायदा तळीराम घेताना दिसत आहेत. दररोज सायंकाळी सातनंतर या ठिकाणी मद्यपी लोकांचा अड्डाच भरलेला असतो. तळीरामांची टोळकी या ठिकाणी खुलेआम मद्यपान करत असतात. अनेकदा त्यांच्यातच वाद होत असल्याने फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसतो.

मद्यपी अनेकदा दारूच्या बाटल्या रिचवून रिकाम्या बाटल्या त्याच ठिकाणी टाकत असतात. त्यामुळे परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर कचरा जमा होत आहे. शिवाय दारूच्या बाटल्यांच्या फुटलेल्या काचांमुळे वन्यप्राण्यांना इजा होण्याची शक्‍यता आहे. हे मद्यपी दारूच्या नशेत वृक्षांचीही नासधूस करत असतात. याबाबत वनविभाग मात्र मूग गिळून गप्प बसून असल्याचे चित्र आहे. त्यांच्या कामचुकारपणामुळे वनविभागाचे मोठे नुकसान होत असून, या तळीरामांचा बंदोबस्त करण्याची मागणी वन्यप्रेमी करीत आहेत.

Web Title: municipal ground liquor bottle