पालिका रुग्णालयाच्या खासगीकरणाचा डाव

ज्ञानेश सावंत
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

पुणे - आरोयसेवा सक्षम करण्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयाचा योग्य वापर होत नसल्याचे कारण देत त्याच्या खासगीकरणाचा हट्ट शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी धरला आहे. या रुग्णालयातील रुग्णसेवा ‘अत्यवस्थ’ असल्याचा शोध या नगरसेवकांनी लावला असून, त्यावर खासगीकरणाचा इलाजही त्यांनीच शोधलाय. या बाबतचा प्रस्ताव मांडून तो बिनबोभाट मंजूर करून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.

पुणे - आरोयसेवा सक्षम करण्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयाचा योग्य वापर होत नसल्याचे कारण देत त्याच्या खासगीकरणाचा हट्ट शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी धरला आहे. या रुग्णालयातील रुग्णसेवा ‘अत्यवस्थ’ असल्याचा शोध या नगरसेवकांनी लावला असून, त्यावर खासगीकरणाचा इलाजही त्यांनीच शोधलाय. या बाबतचा प्रस्ताव मांडून तो बिनबोभाट मंजूर करून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.

गरीब रुग्णांना स्वस्तात सेवा पुरविण्यासाठी उभारलेले हॉस्पिटल स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी अशा प्रकारे खासगी व्यावसायिकांच्या घशात घालण्याचा प्रयत्न नगरसेवकच करीत असतील तर रुग्णांनी काय करायचा, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

शहरातील दुर्बल घटकातील लोकांसाठी महापालिकेने विविध रुग्णालये आणि हॉस्पिटल उभारली आहेत. यातील अनेक ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध केल्या आहेत. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे दोन वर्षांत महापालिकेच्या रुग्णालयांत रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. आजघडीला या रुग्णालयांत रोज सुमारे साडेसहा हजार रुग्ण येतात. 

दरम्यान, या रुग्णालयांतील रुग्ण सेवेचा दर्जा सुधारण्याऐवजी मोठ्या रुग्णालयांचे खासगीकरण करण्याचा डाव त्या प्रभागातील नगरसेवक आखत असल्याचे उघड झाले आहे. येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव शिवसेनेचे नगरसेवक अविनाश साळवे आणि श्‍वेता चव्हाण यांनी महिला व बाल कल्याण समितीपुढे ठेवला आहे. तो बिनबोभाट मंजूर करून घेण्यासाठीही हालचाली सुरू आहेत.

या बाबत महापालिकेच्या प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे म्हणाल्या, की खासगीकरणाचा कोणताही प्रस्ताव अद्याप प्रशासनाकडे आलेला नाही. प्रस्ताव आल्यानंतर चर्चा करून पुढील कार्यवाही केली जाईल.

कोणत्याही राजकीय पक्षांनी खासगीकरणाचा प्रस्ताव दिला तरी तो मंजूर करणार नाही. राजीव गांधी रुग्णालयात सर्वच प्रकारच्या सुविधा पुरवू. त्यासाठी पुरेसा निधी दिला जाईल; पण गरीब रुग्णांचे हाल होणार नाहीत, याची काळजी घेऊ. 
- श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते

रुग्णांना चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी रुग्णालयांत सुविधा निर्माण केल्या आहेत. मात्र, खासगीकरणाचा प्रस्ताव आला असला तरी, तो लगेचच  मंजूर होणार नाही. त्याबाबत बैठकीत चर्चा होईल. मात्र, खासगीकरण करणार नाही.
- राजश्री नवले, अध्यक्ष, महिला व बालकल्याण समिती

अधिकाऱ्यांनाही तेच हवंय!
महापालिकेच्या रुग्णालयांची व्याप्ती वाढली असली तरी, अधिकारी-कर्मचारी फार कमी आहेत. त्यामुळे नवनव्या सुविधा उपलब्ध असूनही रुग्णांना फायदा होत नाही. तोकड्या मनुष्यबळाचे भांडवल अधिकारी करीत असून, महापालिकेच्या मर्यादा लक्षात घेता, काही हॉस्पिटलसाठी खासगीकरणाचा पर्याय योग्य असल्याचा महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सूर आहे. त्यामुळे अधिकारीही रुग्णालयाच्या खासगीकरणाच्या प्रस्तावाला बळ देत असल्याचे उघड झाले आहे.

Web Title: Municipal Hospital Privatization