दोन डॉक्‍टर, परिचारिकांची चौकशी सुरू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

पुणे - महापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या शुभांगी जानकर यांना रक्तदाबाचा त्रास होता. त्यामुळे उपचारासाठी त्यांना दाखल करून घेणे अपेक्षित असताना तेथील डॉक्‍टरांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून दोघा डॉक्‍टरांसह परिचारिकेची खातेनिहाय चौकशी करण्यात येत आहे. ‘सकाळ’ने वृत्तमालिकेद्वारे हा विषय ऐरणीवर आणला आहे.

महापालिकेच्या रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. मात्र, त्यांना योग्य उपचार मिळत नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून आढळून आले आहे. त्यातून राजीव गांधी रुग्णालयात शुभांगी जानकर यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. जानकर या गांधी रुग्णालयात २१ मार्चला उपचारासाठी गेल्या होत्या. तेव्हा त्यांना रक्तदाबाचा त्रास असल्याचे दिसून आले; परंतु त्यांना दाखल न करताच आठ दिवसांनी तपासणीकरिता येण्याचा सल्ला डॉ. विजय बडे यांनी दिला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जानकर यांचा मृत्यू झाला. आदल्या दिवशी उपचार न मिळाल्यानेच त्यांना प्राण गमवावा लागल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर डॉ. बडे यांच्यासह डॉ. मनोज बगाडे आणि एका परिचारिकेची खातेनिहाय चौकशी सुरू आहे. 

दत्ता धनकवडे म्हणाले, ‘‘रुग्णालयांमध्ये सेवा-सुविधा असूनही उपचार दिले जात नाहीत. प्रशासनाचे याकडे लक्ष नाही.’’ महापालिकेने ‘कॉल सेंटर’ सुरू करण्याची मागणी प्रशांत जगताप यांनी केली.

वर्षा तापकीर म्हणाल्या, ‘‘रुग्णालयाकडे यंत्रणा असल्या तरी त्यांचा योग्यवापर होत नसून, त्याला अधिकारी जबाबदार आहेत. ’’ अश्‍विनी कदम म्हणाल्या, ‘‘गर्भावस्थेत महिलांची गैरसोय करणे योग्य नाही. आरोग्य खात्यातील अधिकारी मनमानी करतात.’’ प्रसूतिगृहांमध्ये पुरेसे कर्मचारी नेमण्याची मागणी रेखा टिंगरे यांनी केली. 

दोन डॉक्‍टरांवर निलंबनाची कारवाई केली असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
-डॉ. अंजली साबणे, प्रभारी आरोग्यप्रमुख, महापालिका

Web Title: municipal hospital women doctor nurse inquiry