प्रश्‍नांचे ‘तीनतेरा’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

शीला दीक्षित या तीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. त्यामुळे सभा तहकुबीची मागणी आपण केली. मात्र, दुसऱ्या दिवशी किंवा दोन-तीन दिवसांत सभा घेणे आवश्‍यक होते.
- दत्ता साने, विरोधी पक्षनेते

पिंपरी - महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून ३२ सर्वसाधारण सभा तब्बल ४३ वेळा तहकूब केल्या आहेत. यामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्‍नांकडे सत्ताधाऱ्यांसह विरोधकही दुर्लक्ष करीत आहेत. गुरुवारची  (ता. २५) सर्वसाधारण सभा तहकूब करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या खांद्याचा वापर केला. यामुळे विरोधकांचे सभागृहाबाहेर वेगळे आणि आत वेगळे स्वरूप पाहायला मिळाले.

शहरात कचऱ्याच्या समस्येने नागरिक त्रासले आहेत. दुसरीकडे, प्रशासनाने नागरिकांना शास्तीकराच्या नोटीस पाठविल्याने विरोधकांना त्यांना आयते कारण मिळाले. या प्रश्‍नावर सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधी पक्षाने एकत्र येत सर्वसाधारण सभेच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका भवनावर मोर्चा काढला. याच प्रश्‍नावर सभागृहात चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, विरोधी पक्षनेते यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडला. यामुळे सभागृहात सर्वजण अवाक्‌ झाले. 

सध्या शहरात कचऱ्याची मोठी समस्या आहे. २० जुलै रोजी होणाऱ्या सभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केली होती. मात्र, श्रद्धांजलीचे कारण पुढे करीत सभा तहकुबीचा डाव भाजपने आखला. 

गुरुवारी सभेला सुरवात होताच शिक्षण समितीसाठी सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांना श्रद्धांजली अपर्ण करून सभा तहकूब करण्याची सूचना मांडली. पिंपळे सौदागर येथे अत्याचाराला बळी पडलेल्या अडीचवर्षीय बालिका तसेच इतरांना श्रद्धांजली अपर्ण करून सभा २० ऑगस्टपर्यंत तहकूब केल्याचे महापौर राहुल जाधव यांनी जाहीर केले. मात्र, त्यानंतर झालेल्या चर्चेच्या वेळी काही नगरसेवकांनी वारंवार होणाऱ्या सभा तहकुबीबाबत नाराजी व्यक्‍त केली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सभा घेण्याची मागणी केली. नगरसेवकांच्या भावना लक्षात घेता महापौर जाधव यांनी वीसऐवजी सहा ऑगस्टपर्यंत सभा तहकूब केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal meeting Issue