प्लॅस्टिकबंदीसाठी महापालिका सज्ज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

पुणे - महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्लॅस्टिकबंदीच्या अंमलबजावणीसाठी तयारी केली आहे. त्याचवेळी बंदीच्या नावाखाली महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास होता कामा नये, अशी भूमिका व्यापारी संघटनांनी घेतली आहे.

पुणे - महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्लॅस्टिकबंदीच्या अंमलबजावणीसाठी तयारी केली आहे. त्याचवेळी बंदीच्या नावाखाली महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास होता कामा नये, अशी भूमिका व्यापारी संघटनांनी घेतली आहे.

मार्च महिन्यात राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदीचा अध्यादेश जारी केला होता. या विरोधात काही व्यापाऱ्यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. त्याची पुढील सुनावणी 20 जुलै रोजी आहे. प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी 140 आरोग्य निरीक्षकांची नियुक्ती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने केली आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 30 वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

पर्यावरणास घातक असल्याने प्लॅस्टिकच्या वापरावर मर्यादा टाकण्यासाठी महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा ( नियंत्रण ) कायद्याची अंमलबजावणी करण्यात येईल. प्लॅस्टिक, थर्माकोल आदींपासून बनविलेल्या अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री आणि वाहतुकीवर मर्यादा या कायद्याने आणल्या गेल्या आहेत.

बंदीतून वगळण्यात आलेल्या बाबी
* औषधांच्या वेष्टनासाठी होणारा वापर
* वन व फलोत्पादन, कृषी, घनकचरा हाताळणी, रोपवाटिकेत वापरण्यात येणारी कंपोस्टेबल प्लॅस्टिक पिशवी
* निर्यातीसाठी आवश्‍यक प्लॅस्टिक, प्लॅस्टिक पिशवीची उत्पादने
* उत्पादनाच्या प्रक्रियेसाठी अनिवार्य वेष्टनाकरिता
* दूध पॅकिंग

इतर महत्त्वाच्या तरतुदी
- पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांवर पुनर्खरेदीची किंमत ठळकपणे छापावी लागणार
- अर्धा लिटरपेक्षा कमी क्षमता असलेल्या पीईटी आणि पीईटीई बाटल्यांचा वापर, खरेदी, विक्री, वितरण, साठवणुकीवर बंदी
- कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांना व्यक्ती, स्वयंसेवी संस्थाही मदत करू शकणार
- काही प्लॅस्टिकचा पुनर्वापर आणि पुनर्चक्रणाबाबत स्पष्टपणे मार्गदर्शक सूचना छापण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

महापालिकेने प्लॅस्टिकबंदीविषयी जनजागृती केली आहे. हॉटेल व्यावसायिक, किरकोळ विक्रेते आदी व्यावसायिकांच्या बैठकाही झाल्या आहेत. महापालिका प्रशासन कायद्याची अंमलबजावणी करण्यास सज्ज आहे.
- सुरेश जगताप, सहआयुक्त, घनकचरा व्यवस्थापन

प्लॅस्टिकबंदीबाबत व्यापाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे; परंतु या कायद्याच्या नावाखाली व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार थांबला पाहिजे. यासंदर्भात व्यापाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत.
- सचिन निवंगुणे, अध्यक्ष, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटना

Web Title: Municipal ready for plastic ban