महापालिकेच्या शिष्यवृत्तीसाठी बुधवारपासून ऑनलाइन अर्ज

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

पुणे : महापालिकेतर्फे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शिष्यवृत्ती आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शैक्षणिक योजनेअंतर्गत शैक्षणिक शिष्यवृत्तींसाठींचे अर्ज 25 जुलै ते 12 सप्टेंबर या कालावधीत dbt.punecorporation.org संकेतस्थळावर ऑनलाइन भरता येतील. महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी महापालिकेतर्फे 2008-09 पासून दर वर्षी या शिष्यवृत्ती देण्यात येतात. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याला पंधरा हजार रुपये आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याला पंचवीस हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीसाठी खुल्या गटातील विद्यार्थ्यांना किमान 80 टक्के गुणांची अट आहे. महापालिका शाळा, रात्र शाळा किंवा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ही अट 10 टक्‍क्‍यांनी शिथिल केली असून, या गटात किमान 70 टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तींसाठी अर्ज करता येईल. चाळीस टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी किमान 65 टक्के गुण मिळविणे आवश्‍यक आहे. शासनमान्य किंवा विद्यापीठ मान्य शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला असेल, तरच ही शिष्यवृत्ती मिळू शकेल. 

ऑनलाइन पद्धतीने भरलेले अर्ज आवश्‍यक कागदपत्रांसह अर्जदार राहत असलेल्या महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत सकाळी साडेदहा ते दुपारी 12 या वेळेत स्वीकारले जातील. अर्जदाराने आधार कार्डशी संलग्न बॅंक खात्याची माहिती अर्जात भरणे आवश्‍यक आहे. बॅंक पासबुक, आधार कार्ड, आवश्‍यकतेनुसार मागासवर्गीय किंवा अपंगत्वाचा दाखला आणि अन्य आवश्‍यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती साक्षांकित करून अर्जासोबत जोडणे आवश्‍यक आहे. अधिक माहितीसाठी 02025501284 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. या वर्षी या योजनेसाठी 21 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 
 
Web Title: For municipal scholarship Online application from Wednesday