क्रीडा निकेतन शाळांना लवकरच प्रशिक्षक

School-Trainer
School-Trainer

पुणे - महापालिकेच्या क्रीडा निकेतन शाळांतील विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षांत क्रीडा प्रशिक्षक मिळणार आहे. एकवट मानधन या पद्धतीवर १८ क्रीडा प्रशिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. भरती प्रक्रिया सुरू केली आहे. 

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा, यासाठी शिक्षण मंडळाने २००९-१० मध्ये क्रीडा निकेतन शाळा सुरू केल्या. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षानंतर या शाळांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी महापालिकेकडे आली. त्यानंतर प्रशिक्षकांची नियुक्ती केली गेली नाही. पूर्वी असलेल्या अकरा प्रशिक्षकांना काढून टाकल्यानंतर या शाळांतील विद्यार्थ्यांना क्रीडा मार्गदर्शन मिळत नव्हते. महापालिकेच्या आकृतीबंधात या पदाची तरतूद नसल्याचे कारण देत प्रशासनाकडून क्रीडा प्रशिक्षक नियुक्त केले जात नव्हते. या प्रश्‍नाकडे ‘सकाळ’ने लक्ष वेधले. नगरसेवक रघुनाथ गौडा यांनी मुख्य सभेत प्रश्‍न उपस्थित केला होता. त्या वेळी प्रशासनाने क्रीडा प्रशिक्षक भरण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते.

या निर्णयानुसार महापालिका प्रशासनाने कबड्डी, खो-खो, हॅंडबॉल, थ्रो बॉल, व्हॉलिबॉल, योगासन, कुस्ती, ॲथलेटिक्‍स, क्रिकेट, ज्यूदो, तलवारबाजी या खेळांसाठी क्रीडा प्रशिक्षक नियुक्त करण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. व्हॉलिबॉल, कुस्ती, तलवारबाजी या खेळांकरिता प्रत्येकी दोन, योगासन आणि ॲथलेटिक्‍स या खेळांसाठी प्रत्येकी तीन आणि उर्वरीत खेळांकरिता प्रत्येकी एक क्रीडा प्रशिक्षक नियुक्त केला जाणार आहे. ही नियुक्ती सहा महिन्यांच्या मुदतीची असून, एकवट मानधनानुसार त्यांना दरमहा दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. 

या आहेत शाळा   
    ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव क्रीडा निकेतन (सिंहगड रस्ता) 
    भारतरत्न सचिन तेंडुलकर क्रीडा निकेतन (माळवाडी, हडपसर) 
    मनपा शाळा क्रमांक १२७ क्रीडा निकेतन (येरवडा) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com