महापालिकेच्या शाळांमध्ये आता ‘संडे स्कूल’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

शहर परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना पोषक आहार पुरविण्याबरोबरच महापालिकेतील आठवी ते दहावीपर्यंतच्या अप्रगत विद्यार्थ्यांसाठी ‘संडे स्कूल’ सुरू करण्याचा अन्नामृत फाउंडेशनचा विचार आहे. या विद्यार्थ्यांना भविष्यात स्वयंरोजगार मिळावा, या दृष्टीने कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याचे फाउंडेशनचे नियोजन आहे.

पिंपरी - शहर परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना पोषक आहार पुरविण्याबरोबरच महापालिकेतील आठवी ते दहावीपर्यंतच्या अप्रगत विद्यार्थ्यांसाठी ‘संडे स्कूल’ सुरू करण्याचा अन्नामृत फाउंडेशनचा विचार आहे. या विद्यार्थ्यांना भविष्यात स्वयंरोजगार मिळावा, या दृष्टीने कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याचे फाउंडेशनचे नियोजन आहे. 

महापालिका आणि देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या सुमारे ८० शाळांमधील २५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना अन्नामृततर्फे मध्यान्न भोजनांतर्गत सकाळ आणि दुपार सत्रात पोषक आहार पुरविला जातो. बजाज उद्योगसमूहासह इतर उद्योगांच्या सहकार्याने ही योजना राबविली जाते. केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रतिविद्यार्थी अनुदानही दिले जाते. आता, ‘संडे स्कूल’मधून विद्यार्थ्यांची प्रगती साधण्याचे फाउंडेशनचे उद्दिष्ट आहे.

याबाबत फाउंडेशनचे शाळा समन्वयक सितापती दास म्हणाले, ‘महापालिकेच्या ७० शाळांमधील २५ हजार विद्यार्थी आणि देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या १० शाळांमधील एक हजार विद्यार्थ्यांना पोषक आहार योजनेचा लाभ दिला जातो. त्याअंतर्गत, विद्यार्थ्यांना पुलाव, सांबार-भात, मूगडाळ, खिचडी, कडधान्ये दिली जातात. याखेरीज, आठवड्यातून एकदा शेंगदाणा लाडू, राजगिरा लाडू, खजूर-खारीक, बिस्किटे, केळी असा पूरक आहारही दिला जातो. संस्थेकडून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमही राबविले जात आहेत. त्याअंतर्गत ‘संडे स्कूल’ची योजना असून त्यामध्ये त्यांच्या आवडी-निवडी पाहून पाकिटे बनविणे, भेटवस्तू तयार करणे, शिवणकाम, संगीत-नृत्य यासारखे कौशल्य आधारित प्रशिक्षण दिले जाणार आहे.’’

मासुळकर कॉलनी येथे हा उपक्रम राबविला जाणार असून, सुरवातीला सुमारे १०० अप्रगत मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. 

पोषक तत्त्व आहार जागृती
फाउंडेशनकडून येत्या जूनपासून पालिकेच्या शाळांमध्ये खेळाद्वारे पोषक तत्त्व आहार जागृती केली जाणार आहे. आहारातील सकस भाज्या कोणत्या? त्यामधून कोणती पोषक तत्त्वे मिळतात, याची माहिती विद्यार्थ्यांना करून देण्याचा संस्थेचा मानस आहे.

Web Title: Municipal School Sunday School Education