#EduPune कंत्राटी शिक्षकांची शाळांकडे पाठ

ब्रिजमोहन पाटील
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

तुमच्या मुलांच्या शिक्षणाची अशीच हेळसांड होतेय? आम्हाला What'sApp करा ९१३००८८४५९वर किंवा मेल करा Webeditor@esakal.com

पुणे - शाळा सुरू होऊन दोन महिने होत आले तरी महापालिका शाळांसाठी भरती केलेले कंत्राटी शिक्षक रुजू होण्यास तयार नाहीत. निवडलेल्या १९० शिक्षकांपैकी पहिल्या यादीत १२८ जणांना बोलाविले होते. पण, त्यातील केवळ ६४ जणच रुजू झाले आहेत. तर, इतर दोन याद्या अद्यापही मान्यतेच्याच प्रतीक्षेत आहेत. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे या शाळांतील विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.  

पुणे महापालिकेच्या पहिली ते सातवीपर्यंतच्या अनुदानित २६७ आणि विनाअनुदानित ५५ अशा एकूण ३२२ शाळा आहेत. अनुदानित शाळांसाठी १ हजार ४५५ पदे मंजूर आहेत, त्यापैकी ९० पदे रिक्त आहेत. सरकारने शिक्षक भरती बंद केल्याने नवीन शिक्षक घेता आलेले नाहीत. ५५ विनाअनुदानित शाळांमधील २७३ शिक्षकांच्या पदांपैकी १९० जागा रिक्त आहेत. ही पदे कंत्राटी पद्धतीने सहा महिन्यांसाठी भरती केली जातात. त्यांना दहा हजार रुपये मासिक वेतन दिले जाते. भरतीची प्रक्रिया पूर्ण करून महापालिकेने ३६० पात्र उमेदवारांची यादी तयार केली. त्यांना मिळालेल्या गुणांनुसार प्राधान्य देऊन शिक्षकांना रुजू होण्यासाठी बोलावले जात आहे.

जूनमध्ये शाळा सुरू होतानाच प्रशासनाने हे सर्व १९० शिक्षक रुजू होतील, याचे नियोजन करणे अपेक्षित होते. आता पहिल्या यादीतील १२८ जणांना रुजू होण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली. त्यातील निम्मेच ६४ शिक्षक हजर झाले. उर्वरित ६४ जणांनी नोकरीला ठेंगा दाखवला. त्यानंतर आता ४० शिक्षकांची यादी मंजुरीला ठेवली आहे. ती मंजूर झाली, की या शिक्षकांना बोलावले जाईल.  

१५ हजार पगाराचा होता प्रस्ताव 
कंत्राटी शिक्षक भरत असले तरी ते चांगले मिळावेत, यासाठी प्रतीमहा १५ हजार रुपये वेतन देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण काही अधिकाऱ्यांनी तो फेटाळला व दहा हजार रुपये वेतन देण्यावर ते ठाम राहिले. दरम्यान, महापालिकेने यापूर्वी सगळ्यात आधी कंत्राटी शिक्षक घेताना त्यांना महिन्याला सहा हजार रुपये वेतन दिले होते. दोन वर्षांपूर्वी त्यात वाढ करून ते दहा हजार रुपये करण्यात आले. त्यामुळे आता पुन्हा वेतनवाढीचा प्रस्ताव दिला होता, असे सूत्रांनी सांगितले. 

विनाअनुदानित शाळांमधील रिक्त १९० शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यात ३६० जणांची निवड केली आहे. पहिल्या यादीतील १२८ जणांपैकी ६४ जण मुदतीमध्ये हजर झाले आहेत. ४० जणांची दुसरी यादी मंजुरीसाठी आहे. त्यानंतर २२ जणांची तिसरी यादी आहे. जी पदे रिक्त रहातील तेथे प्रतीक्षा यादीतील शिक्षकांना बोलावले जाईल.
- मीनाक्षी राऊत, शिक्षण अधिकारी (प्राथमिक) महापालिका  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal schools are not ready to join the recruitment of contract teachers