महापालिका शाळांच्या इमारतींचे होणार 'सेफ्टी ऑडिट' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

पुणे -  विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांच्या इमारतींचे "सेफ्टी ऑडिट' (सुरक्षा लेखापरीक्षण) करण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या आवश्‍यक उपाययोजनाही लगेचच उभारण्यात येणार आहेत. पुढील पंधरा दिवसांत शाळांच्या इमारतींची पाहणी केली जाणार असून, त्यानंतर आवश्‍यक ती कामे करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. 

पुणे -  विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांच्या इमारतींचे "सेफ्टी ऑडिट' (सुरक्षा लेखापरीक्षण) करण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या आवश्‍यक उपाययोजनाही लगेचच उभारण्यात येणार आहेत. पुढील पंधरा दिवसांत शाळांच्या इमारतींची पाहणी केली जाणार असून, त्यानंतर आवश्‍यक ती कामे करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. 

विशेषतः शाळांच्या इमारतींचे छत, जिना, वर्गखोल्यांच्या खिडक्‍या, शाळेभोवतीचे कुंपण आणि पाण्याच्या टाक्‍यांची पाहणी करून सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात येणार आहे. यासाठी पंधरा पथके नेमली जाणार असून, त्यात शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल. 

सहकारनगरमधील राजीव गांधी ई- लर्निंग स्कूलमध्ये खिडकीतून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरातील शाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या विविध शाळांमधील सुमारे 310 इमारतींमध्ये सुरक्षिततेसाठी उभारलेल्या सेवा- सुविधांचा आढावा घेण्यात येणार आहे. प्रथमतः शाळांमध्ये नेमक्‍या कोणत्या सुविधा आहेत, त्या पुरेशा आहेत का, याचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. 

सर्व शाळांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या आहेत. तरीही, सर्व शाळांच्या इमारतींची पाहणी करून लवकरच आवश्‍यक ती कामे करण्यात येतील. 

- वासंती काकडे, अध्यक्ष, शिक्षण मंडळ 

शाळांच्या इमारतींची देखभाल- दुरुस्ती प्राधान्याने करण्यात येईल. शाळेत कोणताही अपघात होणार नाही, याची काळजी घेऊन आवश्‍यक त्या उपाययोजना करू. 

- शुभांगी चव्हाण, प्रमुख, शिक्षण मंडळ 

वर्षातून दोनदा तपासणी 

राजीव गांधी ई- लर्निंग शाळेतील घटना निव्वळ अपघात आहे. अशा घटना घडू नयेत, यासाठी शाळांमध्ये आवश्‍यक उपाययोजना केल्या असून, त्याची देखभाल- दुरुस्तीही केली जाते. या पुढील काळात, सर्व शाळांमधील इमारतींचे वर्षातून दोनदा ऑडिट करण्यात येणार आहे. गरजेनुसार सुविधा निर्माण केल्या जातील, असे शिक्षण मंडळाच्या प्रमुख शुभांगी चव्हाण यांनी सांगितले. 

 

...याचे होणार "ऑडिट' 

- शाळांच्या इमारतींचे छत, जिना 

- वर्ग खोल्यांच्या खिडक्‍या 

- शाळेभोवतीचे कुंपण 

- पाण्याच्या टाक्‍या

Web Title: Municipal schools buildings will be "safety audit"