महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांकडूनच चोऱ्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिकेचे सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षकांचे ठेकेदार यांची मिलिभगत आहे. महापालिकेतील ठेकेदारच चोऱ्या करतात, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनी केला. तसेच ठेकेदारी पद्धतीने नेमलेले सुरक्षारक्षक ड्रेसकोड पाळत नाहीत, गैरहजर राहतात, कामावर असताना दारूच्या पार्ट्या करतात, असाही आरोप साने यांनी केला असून त्यांच्यावर कारवाईची मागणीही केली. 

पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिकेचे सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षकांचे ठेकेदार यांची मिलिभगत आहे. महापालिकेतील ठेकेदारच चोऱ्या करतात, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनी केला. तसेच ठेकेदारी पद्धतीने नेमलेले सुरक्षारक्षक ड्रेसकोड पाळत नाहीत, गैरहजर राहतात, कामावर असताना दारूच्या पार्ट्या करतात, असाही आरोप साने यांनी केला असून त्यांच्यावर कारवाईची मागणीही केली. 

बुधवारी (ता.28) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर शकुंतला धराडे होत्या. नगरसेवक दत्ता साने यांनी सुरक्षा विभाग, ठेकेदारी पद्धतीने नेमलेले सुरक्षारक्षक आणि नियमावलीबाबत प्रश्‍न सभेत उपस्थित केले होते. त्यांनी ठेकेदारी पद्धतीने नेमलेले रखवालदार ड्रेसकोड पाळत नाहीत. नेमलेल्या ठिकाणी सर्रास दारूच्या पार्ट्या रखवालदार करतात. कामावर नसतानाही पगार दिला घेतला जातो. पालिकेच्या मिळकतीसाठी नेमलेले सुरक्षारक्षकच तिथे चोऱ्या करीत असल्याचा गंभीर आरोप साने यांनी सभेत केला. 

तसेच, पालिकेला सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या ठेकेदारांच्या बाबतीतही साने यांनी आरोप केले आहेत. पालिकेत अनेक डमी सुरक्षा ठेकेदार नेमलेले आहेत. ठेकेदार नेमलेल्या रखवालदारांना किमान वेतन देत नाहीत. साडेतेरा हजार रुपये वेतन असताना त्यांच्या हाती फक्त सहा हजार रुपये दिले जातात. पालिकेच्या सुरक्षा ठेकेदारांकडे परवाना नसल्याचे समोर आलेले आहे. चारित्र पडताळणीशिवाय रखवालदारांची नियुक्‍ती केली जाते. केवळ रजिस्टरवर नामधारी सुरक्षारक्षक दाखवून पालिकेची लाखो रुपयांची फसवणूक या ठेकेदारांकडून केली जात असल्याचा आरोप साने यांनी केला. 

सुरक्षा विभागातील अधिकारी उदय जरांडे, वाबळे हे खालच्या रखवालदारांची पिळवणूक करतात. रजेसाठी दारूची बाटली आणि पार्ट्या अधिकाऱ्यांकडून मागितल्या जातात अरेरावी, शिवीगाळ केली जाते. महिला सुरक्षारक्षकांनाही चुकीची वागणूक या अधिकाऱ्यांकडून दिली जाते. 

या गोष्टींबाबत फक्त गौडबंगाल उत्तरे सुरक्षा विभागाकडून दिली जातात. ठेकेदारांवर आपले नियंत्रण नसल्याने चुकीच्या पद्धतीने कारभार चालत आहे. या सगळ्यात अधिकारी, ठेकेदार यांची मिलीभगत असून, याबाबत कारवाई करण्याची मागणी साने यांनी केली. 

आरोपांची शहानिशा करण्यासाठी चौकशी समिती ः आयुक्‍त 
याबाबत महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी खुलासा करताना या सर्व गोष्टींची शहानिशा केली जाईल. त्यासाठी चौकशी समिती नेमण्यात येईल. त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन त्यांनी सभेत दिले. 

Web Title: Municipal security guards thefts