महापालिकेच्या गाळ्यांना ‘डिमांड’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

महापालिकेने शहरात उभारलेल्या व्यापारी गाळ्यांना मोठी मागणी आहे. निश्‍चित दरापेक्षा तीन ते चार पट अधिक भाडे देऊन गाळे घेण्याची तयारी निविदादारांनी दाखवली आहे. त्यामुळे सुमारे साडेचार कोटी रुपयांचा फायदा महापालिकेला होणार आहे.

नियोजित दरापेक्षा चार पट अधिक रक्कम देण्यास निविदादार तयार
पिंपरी - महापालिकेने शहरात उभारलेल्या व्यापारी गाळ्यांना मोठी मागणी आहे. निश्‍चित दरापेक्षा तीन ते चार पट अधिक भाडे देऊन गाळे घेण्याची तयारी निविदादारांनी दाखवली आहे. त्यामुळे सुमारे साडेचार कोटी रुपयांचा फायदा महापालिकेला होणार आहे.

महापालिकेने शहराच्या विविध भागांत व्यापारी गाळे बांधले आहेत. व्यावसायिकांना ते भाडेकराराने दिले आहेत. चार ठिकाणचे १०३ गाळे रिक्त होते. त्यासाठी ई-निविदा मागविल्या होत्या. उच्चतम दर देणाऱ्या निविदादारांना दहा वर्षे भाडेकराराने गाळे देण्यात येणार आहेत. त्यातील ३५ गाळ्यांना उच्चतम दर देण्याची तयारी निविदादारांनी दर्शविली आहे. यातील पिंपरी गावातील सात, चिंचवड गावातील मोरया रुग्णालयासमोरील २२ आणि आकुर्डीतील सहा गाळ्यांचा समावेश आहे. या सर्व गाळ्यांसाठी तीनपेक्षा अधिक निविदा प्राप्त झाल्या आहेत. या गाळ्यांच्या भाडेकराराची रक्कम महापालिकेने दोन कोटी १० लाख ५६ हजार ७८९ रुपये निश्‍चित केली आहे. निविदादारांकडून सहा कोटी ७२ लाख ३२ हजार ४९४ रुपयांचा दर प्राप्त झाला आहे. त्यामुळे महापालिकेला चार कोटी ६१ लाख ७५ हजार ६०५ रुपये जादा उत्पन्न मिळणार आहे. तसेच, तीन पेक्षा कमी निविदा आलेल्या गाळ्यांनाही जादा दर मिळाला आहे. यातील गाळ्यांचे भाडे महापालिकेने ५१ लाख ८३ हजार ८१२ रुपये निश्‍चित केले होते. निविदादारांनी ६७ लाख ८७ हजार ४६३ रुपये भाडे देण्याची तयारी दर्शविली आहे. स्थायी समितीच्या मान्यतेने गाळे भाडेकराराने देण्यात येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Shop Demand Increase