मतदारांची ‘पळवा पळवी’

voter
voter

पुणे - महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार याद्यांत अनेक ठिकाणी मतदारांची ‘पळवा पळवी’ झाल्याबद्दल इच्छुकांनी महापालिकेकडे आक्षेप नोंदविले आहेत. त्यामुळे एका प्रभागात राहणाऱ्या मतदारांना मतदान करण्यासाठी मात्र दुसऱ्या प्रभागात जावे लागणार आहे. तसेच महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रभागाच्या रचनेच्या नकाशात ज्या ठिकाणी मतदार राहतात, त्यांचे नाव मात्र भलत्याच प्रभागात गेल्याचे समोर आले आहे.

 महापालिका प्रशासनाने २० डिसेंबरच्या सुमारास शहरातील ४१ प्रभागांतील मतदारांच्या प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. महापालिकेच्या संकेतस्थळावरही त्या उपलब्ध आहेत. मात्र, त्या याद्यांत अनेक ठिकाणी घोळ झाल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील १८-२० प्रभागांच्या सीमेवरील नावांचा घोळ झाला आहे. मतदार राहतात एका भागात, त्यांचे मतदार यादीत नाव मात्र दुसऱ्याच प्रभागात, असे प्रकार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रारूप मतदार यादीचा फेरआढावा घेण्यासाठी महापालिकेला निवेदन सादर केले असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष हेमंत संभूस यांनी दिली. धनकवडी-आंबेगाव पठार (प्रभाग ३९) मधील शिवसेनेच्या इच्छुक नेहा कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘प्रभाग ३९ मध्ये राहत असलेल्या सुमारे १५ हजार मतदारांची नावे राजीव गांधी उद्यान- बालाजीनगरला (प्रभाग ३८) जोडली गेली आहेत. त्यामुळे संबंधित मतदारांना त्रास होणार असून, राजकीय हेतूने ही नावे वगळण्यात आली आहेत.’’ प्रभाग ३९ मधील मतदारांची अनेक नावे सहकारनगर- पद्मावती (प्र. ३५), राजीव गांधी उद्यान- बालाजीनगर (प्र. ३८) आणि आंबेगाव दत्तनगर- कात्रज गावठाण (प्र. ४०) मध्ये गेली आहेत. त्याबाबतचा आक्षेप महापालिकेकडे नोंदविला असल्याचे इच्छुक उमेदवार विशाल तांबे यांनी नमूद केले. 

शहराच्या मध्यभागातील डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी (प्र. १४) प्रभागात एरंडवण्यातील सुमारे १५०० नावे आली असल्याचे शिवसेनेचे इच्छुक शिरीष आपटे यांनी सांगितले. नवी पेठ- पर्वती (प्र. २९) आणि मार्केट यार्ड- लोअर इंदिरानगरमधील (प्र. ३६) ४७०० मतदारांची नावे सॅलिसबरी पार्क- महर्षीनगरमध्ये (प्र. २८) समाविष्ट झाली आहेत. जनता वसाहत, पर्वती दर्शनमधील मतदारांच्या याद्या महर्षीनगरमध्ये समाविष्ट झाल्या आहेत, असे प्रभाग २८ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार 

बाळासाहेब अटल यांनी सांगितले. अटल यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी त्याबाबत शनिवारी पडताळणीही केली. मार्केट यार्ड - लोअर इंदिरानगरमधील (प्र. ३६) सुमारे ६००० मतदारांची नावे अपर- सुपर इंदिरानगर (प्र. ३७) प्रभागात समाविष्ट झाली आहेत, असेही तेथील इच्छुकांनी नमूद केले.

तथ्य आढळल्यास दखल घेणार - कुलकर्णी
या बाबत महापालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश कुलकर्णी म्हणाले, ‘‘प्रारूप मतदार यादी विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या मतदार यादीनुसार तयार केली आहे. त्यात मतदारांचे जे पत्ते होते, त्यानुसार त्यांचे प्रभाग निश्‍चित झाले आहेत. त्यात काही चुका झाल्या असतील, तर त्या दुरुस्त केल्या जातील; परंतु विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीतील पत्ते आता बदलता येणार नाहीत. मात्र, पुरवणी यादी १२ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे मतदारांना पुन्हा १७ जानेवारीपर्यंत हरकती-सूचना नोंदविता येतील. त्यात तथ्य असल्यास त्याची दखल घेतली जाईल. त्यानुसार अंतिम मतदार यादी २१ जानेवारीला प्रसिद्ध होईल.’’ प्रारूप मतदार यादीबद्दल हरकती-सूचना नोंदविण्यासाठी वेळ मिळावा, यादी निर्दोष आणि अचूक व्हावी, यासाठी महापालिकेने स्वतःहून अधिक कालावधी दिला आहे. प्रशासनाकडून काही चुका झाल्या असतील, तर त्याची खातरजमा करून त्यांची दुरुस्ती करू, असेही त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com