Corona-Test
Corona-Test

कोरोना रुग्णांच्या चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांवर महापालिकेची नजर

पुणे - कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध लागत नसल्याने महापालिकेने चाचण्या करणाऱ्या खासगी प्रयोगशाळांवर नजर रोखली आहे. चाचण्या केलेल्या प्रत्येकाच्या नावासह घराचा पत्ता, मोबाईल क्रमांक आणि अन्य सविस्तर माहिती ठेवण्याची तंबीच प्रयोगशाळा व्यवस्थापनांना दिली आहेत. चाचण्यांच्या प्रक्रियेत गाफील राहणाऱ्या प्रयोगशाळांवर ‘लाल फुली’ मारली जाऊ शकते, असा इशाराही त्यांना दिला आहे. 

शहरात भारतीय वैद्यक संशोधन संस्थेची (आयसीएमआर) मान्यता असलेल्या विविध १७ प्रयोगशाळांच्या प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना ‘ॲलर्ट’ केले आहे. चाचण्या झाल्यानंतर नागरिकांच्या नोंदीत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या साथीत रुग्णांसह त्यांचे कुटुंबीय व जवळचा संपर्क आलेल्या व्यक्तींचीही तपासणी केली जाते. सध्या एका रुग्णामागे किमान १५ जणांची तपासणी करणे अपेक्षित आहे. मुळात, खासगी प्रयोगशाळांकडे तपासणी केलेल्या रुग्णांची पुरेशी माहिती नसल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विशेषत: रुग्णाच्या नावांतील चुका, घराच्या पत्त्यात बदल आणि मोबाईल क्रमांक चुकीचा असणे किंवा तो बंद राहात असल्याचे महापालिकेने घरोघरी जाऊन केलेल्या मोहिमेतून दिसून आले आहे. परिणामी, काही वेळा रुग्णच सापडत नसल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे महापालिका कर्मचाऱ्यांना अशक्य झाले आहे. त्यामुळे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ कमी होत असल्याची ओरड आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नाराजी व्यक्त केली होती.

कोविड पोर्टलद्वारे नियंत्रण
देशभरातील कोरोना रुग्णांची माहिती एकत्र करून त्यावर कोविड पोर्टलद्वारे नियंत्रण ठेवले जाते. दिल्लीतील यंत्रणाही या रुग्णांच्या संपर्कात असते. मात्र, काही रुग्णांचा संपर्क होत नसल्याने या यंत्रणांनीही नाराजी व्यक्त केली होती. तसेच, पुण्यात पहिल्या टप्प्यातही अपेक्षित ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ झाले नसल्यावरून केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महापालिकेला जाब विचारला होता.

१७ (आयसीएमआरची मान्यता) खासगी प्रयोगशाळा 
२,५०० खासगी प्रयोगशाळांकडील रोजच्या चाचण्या

प्रयोगशाळांच्या पातळीवर रुग्णांबाबत पुरेशा नोंदी नसल्याचे निदर्शनास आले आहे. रुग्ण आणि संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना विलग केल्यानंतर संसर्गाची साखळी तोडणे शक्य होईल. त्यासाठीच्या सूचना प्रयोगशाळांना केल्या आहेत. 
- डॉ. संजीव वावरे, साथरोग नियंत्रण अधिकारी

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com