हद्दीबाहेरही दिले महापालिकेने नळजोड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

पुणे - महापालिका हद्दीबाहेर खासगी प्रकल्पांना स्वतंत्र नळजोड देता येत नाही, असे सांगणाऱ्या महापालिकेने हद्दीबाहेरील बांधकाम व्यावसायिकांच्या दोन प्रकल्पांना नळजोड दिले आहेत. महापालिकेनेच सदस्यांच्या प्रश्‍नांना लेखी उत्तरे देताना याबाबतची कबुली दिली आहे.  

पुणे - महापालिका हद्दीबाहेर खासगी प्रकल्पांना स्वतंत्र नळजोड देता येत नाही, असे सांगणाऱ्या महापालिकेने हद्दीबाहेरील बांधकाम व्यावसायिकांच्या दोन प्रकल्पांना नळजोड दिले आहेत. महापालिकेनेच सदस्यांच्या प्रश्‍नांना लेखी उत्तरे देताना याबाबतची कबुली दिली आहे.  

महापालिकेकडून केशवनगर, महादेवनगर, साडेसतरानळी, फुरसुंगी, देवाची उरुळी व मंतरवाडी, उंड्री-पिसोळी; तसेच खडकवासला, किरकटवाडी, नांदेडगाव, धायरी नऱ्हे, आंबेगाव बुद्रुक आणि येवलेवाडीला पाणीपुरवठा केला जातो. या ग्रामपंचायतींना त्यांच्या टाक्‍यांपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येतो. तेथून ग्रामपंचायती पाण्याचे वितरण करतात. महापालिका हद्दीबाहेरील खासगी प्रकल्पांना स्वतंत्र नळ जोड देण्यात येत नाही, असे महापालिकेने लेखी उत्तरात सांगितले आहे. याबाबत नगरसेवक विशाल तांबे यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. मात्र, हद्दीबाहेर अमित बिल्डर्सला तत्कालीन महापालिका आयुक्तांच्या परवानगीने ६ एप्रिल २०१५ रोजी दोन इंच व्यासाचे तीन नळजोड देण्यात आले आहेत; तसेच धायरीतील डीएसके विश्‍व या प्रकल्पासाठी दोन जून २००६ पासून चार इंच व्यासाच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी विहिरीतून रॉ वॉटर पुरविण्यात येत आहे. या दोन्ही व्यावसायिकांकडून पाणीपुरवठ्यासाठी बिलाची वसुली करण्यात येत असल्याचेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हद्दीबाहेरील नळजोडांबाबत आज अहवाल सादर होणार 
महापालिका हद्दीबाहेरील अनधिकृत नळजोडांवर कारवाई कधी झाली, त्याबाबतचे नियोजन काय आहे, महापालिकेच्या जलवाहिनीवर हद्दीबाहेरून किती नळजोड घेतले आहेत, हद्दीबाहेरील ग्रामपंचायतींकडे थकबाकी किती आहे, याबाबतचा सविस्तर अहवाल प्रशासनाने सादर करावा, अशी मागणी तांबे यांनी केली होती. त्यानुसार महापौर मुक्ता टिळक यांनी केलेल्या सूचनेनुसार महापालिका प्रशासन १९ एप्रिल रोजीच्या सर्वसाधारण सभेत अहवाल सादर करणार आहे.

Web Title: municipal water connection gives to out of area