बारामतीत नगरपालिकेने घेतला मोठा निर्णय, वाचा सविस्तर

मिलिंद संगई
Thursday, 19 November 2020

स्वच्छ सर्वेक्षण 2021 माझी वसुंधरा अभियानासाठी बारामती नगरपालिकेने जोरदार तयारी सुरु केली आहे. या अंतर्गत आता बारामती नगरपालिका ओला व सुका कचरा वर्गीकरण केलेला असेल तरच स्विकारणार आहे.

बारामती : स्वच्छ सर्वेक्षण 2021 माझी वसुंधरा अभियानासाठी बारामती नगरपालिकेने जोरदार तयारी सुरु केली आहे. या अंतर्गत आता बारामती नगरपालिका ओला व सुका कचरा वर्गीकरण केलेला असेल तरच स्विकारणार आहे. मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी या बाबत माहिती दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामती नगरपालिकेकडून अजूनही ओला व सुका कचरा एकत्रच जमा केला जात आहे. स्वच्छ सर्वेक्षण अहवालात यामुळे नगरपालिकेच्या स्थानावर विपरीत परिणाम तर होत आहेच, शिवाय या कचरा वर्गीकरण न होण्याने अनेक प्रश्नांनाही नगरपालिकेला सामोरे जावे लागत आहे. वास्तविक शासकीय धोरणानुसारही हा कचरा विलगीकरण केलेल्या अवस्थेतच स्विकारणे गरजेचे आहे. 

इतक्या दिवस नगरपालिकेने या बाबत काही पावले उचलली नव्हती, आता मात्र आरोग्य विभागाच्या वतीने प्रत्येक नागरिकाने दोन डस्टबिनमध्ये ओला व सुका कचरा वेगळा गोळा करावा यासाठी प्रबोधन सुरु करण्यात आले असून, घंटागाडीमध्ये कचरा टाकण्यापूर्वी तो विलगीकरण करुनच टाकावा, असे आवाहन करण्यात येत आहे. कचरा विलगीकरण न करता स्विकारला जाणार नाही, असा इशाराच आता आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. 

नगरपालिकेच्या घंटागाडीमध्येही ओला व सुका कचरा दोन स्वतंत्र कप्प्यात स्विकारला जाणार आहे. बारामतीकरांनी या पुढील काळात दोन स्वतंत्र डस्टबिनमध्ये ओला व सुका कचरा वेगळा जमा करण्याची सवय लावून घ्यावी -किरणराज यादव, मुख्याधिकारी, बा. न. प. 

 पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ओला कचरा-
•    पालेभाज्या व फळांचा राहिलेला भाग
•    शिजविलेले किंवा न शिजविलेले अन्न
•    फळे व फुलांचा कचरा
•    गळलेली किंवा सडलेली झाडांची पाने. 
सुका कचरा
•    कागद, प्लॅस्टिक, लाकूड
•    कापड किंवा फायबरच्या वस्तू
•    तार
•    रबर रेक्झिन किंव तत्सम वस्तू
•    थर्माकोल.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipalities make waste segregation mandatory in Baramati