पदरात यश पडू दे...ओटी भरीन, नवसही फेडीन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

पुणे - पक्षाने संधी दिली, निवडणूकही लढलो, प्रचारही जोरदार केला. पाण्यासारखा पैसाही खर्च केला. मतदानही झालंय, आता पदरात यश पडू दे...तुझी ओटी भरीन, तुझा नवस फेडायला पुन्हा दारी येईन. कुलदैवतेसह श्रद्धेय महाराज आणि बाबांना आर्जवाने आळवणी करीत बहुतांश उमेदवारांनी बुधवारी देवदर्शनासाठी मंदिर, दर्गा, चर्च अन्‌ गुरुद्वाराच्या पायऱ्याही चढल्या. 

पुणे महापालिकेसाठी मंगळवारी (ता. २१) मतदान झाले. उद्या गुरुवारी (ता. २३) मतमोजणी आहे. अंतिम निकाल यायला अवघे काही तास राहिलेत. मतदारराजाची मनधरणी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून उमेदवार घरोघरी हिंडले, कार्यकर्त्यांनीही जोमाने प्रचारात सहभाग घेतला. त्यांची बडदास्तही ठेवली. जेवणावळीही घातल्या. लाखो रुपये खर्चून सोशल मीडियाचाही आधार अनेक उमेदवारांनी घेतला. पक्षाकडून जेव्हा उमेदवारी जाहीर झाली. तेव्हापासून घरची मंडळी, नातेवाईक कामाला लागले. कुणी कुलदैवतांना जाऊन विडा, नारळ ठेवून आले. मंगळवारी मतदान प्रक्रियाही निर्विघ्न पार पडली. गुरुवारी मतमोजणी असल्याने, बुधवारचा दिवस उमेदवार आणि कार्यकर्त्यांना मोकळा मिळाला. काही उमेदवार कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांसमवेत देवदर्शनासाठी बाहेर पडले होते. कोणी शेगावला श्री गजानन महाराजांच्या दर्शनाला, तर कोणी पक्षाला बहुमत मिळावे म्हणून अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेले.काही उमेदवारांनी मात्र आपल्या आई-वडिलांनाच दैवत मानून, त्यांचेच दर्शन घेतले, तर काहींनी मित्र, मैत्रिणी, नातेवाईक आणि कार्यकर्त्यांसमवेत यशापयशाची चर्चा करण्यात आणि भविष्याचे नियोजन करण्यात बुधवारचा दिवस घालविला.

ग्रामदैवतांना साकडे
जेजुरीचा खंडोबा, श्री क्षेत्र वीर येथील नाथ म्हस्कोबा, तुळजाभवानीलाही काहींनी साकडे घातले. मूळगाव असलेल्या ग्रामदैवताच्या दर्शनाला कोणी प्राधान्य दिले. काहींनी पुण्यातील ग्रामदैवत कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्‍वरीचे दर्शन घेतले. काही उमेदवारांनी शहर व उपनगरांतील वेगवेगळ्या दर्ग्यांना तसेच चर्च आणि गुरुद्वारात जाऊन यशासाठी प्रार्थना केली.

Web Title: municpal election result pune