दोन मुलांना मारून वडिलांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

पिंपरी - दोन लहान मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (ता. १८) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ताथवडे येथे उघडकीस आली.

पिंपरी - दोन लहान मुलांना मारून वडिलांनी आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (ता. १८) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ताथवडे येथे उघडकीस आली.

शुभम बर्मन (वय १०), रूपम बर्मन (वय ८) आणि दीपक बर्मन (सर्व रा. नृसिंह कॉलनी, ताथवडे) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक बर्मन हे राहत असलेल्या गल्लीत सनबीन ऑटो प्रॉडक्‍ट या कंपनीत हेल्पर म्हणून कामाला होते.  त्यांची पत्नी मालती या घरासमोरच असलेल्या मायक्रो गेज या कंपनीत हेल्पर म्हणून कामाला आहेत. दुपारी त्या जेवण करण्यासाठी घरी आल्या. तेव्हा त्यांना दरवाजा लोटून घेतल्याचे दिसून आले. त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा पतीने गळफास घेतल्याचे दिसले. दोन मुले जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत आढळली. ही घटना पाहताच त्यांनी मोठ्याने किंकाळी मारली. त्याचा आवाज ऐकून नागरिक व मालती यांच्या कंपनीतील सहकारी धावत त्यांच्या घरी आले. त्यांनी दोन मुले व पती यांना त्वरित वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

दीपक बर्मन हे सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घरी आले. त्या वेळी त्यांची पत्नी कामावर गेली होती. दुपारी साडेबारा वाजता थेरगाव येथील बालविकास विद्यालयातून दोन्ही मुले घरी आली. ते दोघेही जेवण करताना अचानक त्यांच्या वडिलांनी त्यांचा गळा आवळला. त्यानंतर दीपक यांनी दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. तसेच दोन्ही मुलांच्या बाजूलाही दोरी पडली होती. घटनास्थळी मुलांची जेवण करीत असलेली ताटे तशीच पडलेली होती. अगदी टोकाचे हे कृत्य दीपक यांनी का केले, याचा शोध पोलिस घेत आहेत.

Web Title: Murder and Suicide Crime