अन् ते दाेघे बाेलू लागताच खुनाचा डाव उघडकीस आला

मिलिंद संगई
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

सुपारी घेऊन खून करण्याचा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या. आठ जिवंत काडतूसांसह दोन गावठी पिस्तूल पोलिसांनी या कारवाईत जप्त केली.

बारामती शहर : तालुका पोलिसांनी तत्परता दाखविल्याने एक अनर्थ टळला व एकाचे प्राणही वाचले. सुपारी घेऊन खून करण्याचा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या. आठ जिवंत काडतूसांसह दोन गावठी पिस्तूल पोलिसांनी या कारवाईत जप्त केली.

बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक धन्यकुमार गोडसे यांनी या बाबत माहिती दिली. दौंड तालुक्यातील राहू येथील उमेश सोनवणे यांनी तालुका पोलिसांना माहिती दिली की, त्यांच्या भावाचा खून वाळूच्या बोटी लावण्याच्या वादातून करण्यात आला होता. त्या बाबतची सुनावणी सध्या बारामतीच्या सत्र न्यायालयात सुरु आहे.

उमेश सोनवणे या कोर्ट सुनावणी कामी बारामतीत येत होते. ते या खटल्यातील मुख्य साक्षीदार असल्याने तसेच त्यांनाच संपवून टाकले तर वाळू व्यवसायावर वर्चस्व निर्माण होईल व खूनाच्या गुन्ह्यातूनही सुटका होईल अशी भावना विरोधी गटाची होती.

त्यामुळे उमेश सोनवणे यांच्या खूनाची सुपारी दिल्याची माहिती धन्यकुमार गोडसे यांना मिळताच त्यांनी फौजदार मोटे व जाधव यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार दादा ओमासे, भानुदास बंडगर, अनिल खेडकर, विनोद लोखंडे, परीमल मानेर, स्वप्नील कुंभार, दत्ता मदने यांची पथके तयार केली.

बारामती दौंड रस्त्यावरील ड्रायव्हर ढाबा येथे धन्यकुमार गोडसे यांच्या पथकाने नीलेश दत्तात्रय शिर्के व सागर हरिदास ढोबळे या दोघांबाबत पोलिसांना संशय वाटल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे दोन पिस्तूल व आठ जिवंत काडतुसे सापडली. 

पोलिस ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी उमेश सोनवणे यांचा खून करण्यासाठी एक लाख रुपयांची सुपारी घेतल्याचे मान्य केले. संतोष संपत जगताप व समीर संपत जगताप यांनी ही सुपारी दिल्याचे या दोघांनी सांगितल्याचे गोडसे यांनी नमूद केले. उमेश सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारामती तालुका पोलिस ठाण्यात  संतोष संपत जगताप, समीर संपत जगताप, दीपक बाळकृष्ण शिंदे (सर्व रा. राहु, तालुका दौंड)  शिवाजी वाघ (रा. पिंपळगाव, ता. दौंड),  नीलेश दत्तात्रेय शेळके (रा. सांगवी सांडस,  ता. शिरूर), सागर हरिदास ढोबळे (रा. राहु पिंपळगाव, ता. दौंड) यांच्या विरुध्द खूनाचा प्रयत्न तसे शस्त्रनियमन कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती धन्यकुमार गोडसे यांनी दिली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The murder attempt was failed in baramati