अक्षरावरून खुनाला वाचा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

पत्नीला महाडजवळ वरंधा घाटात नेऊन खोल दरीत ढकलून दिले. त्यानंतर हा खून पचविण्यासाठी पतीने पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. शिवाय, घरात तिने ठेवलेली चिठ्ठी सापडल्याचे पोलिसांना सांगितले; परंतु त्या चिठ्ठीतील अक्षरच तिचे नसल्याचे वडील आणि भावाने पोलिसांना सांगितले आणि खुनाला वाचा फुटली...

पत्नीला महाडजवळ वरंधा घाटात नेऊन खोल दरीत ढकलून दिले. त्यानंतर हा खून पचविण्यासाठी पतीने पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. शिवाय, घरात तिने ठेवलेली चिठ्ठी सापडल्याचे पोलिसांना सांगितले; परंतु त्या चिठ्ठीतील अक्षरच तिचे नसल्याचे वडील आणि भावाने पोलिसांना सांगितले आणि खुनाला वाचा फुटली...

हडपसरच्या हांडेवाडी येथील नारायण कुदळे यांची मुलगी सुनीता. पित्याने लाडक्‍या मुलीचे महादेवनगर येथील विक्रम शेवते या तरुणासमवेत थाटामाटात लग्न लावून दिले. लग्नाच्या वेळी ठरल्यानुसार चार तोळे सोने आणि लग्नाचा खर्च दिला. सुनीता नांदण्यास सासरी गेली. या दांपत्याला दोन मुलीही झाल्या; परंतु सासरच्या लोकांनी मोटार खरेदी करण्यासाठी पैशाची मागणी करीत छळ सुरू केला. सुनीताचा हा छळ पाहून असह्य झालेल्या पित्याने पैशाची जमवाजमव केली. 

एक लाख रुपये दिल्यानंतर विक्रमने मोटार खरेदी केली. मात्र, नंतर रुग्णालयात उपचारावर खर्च झाल्यामुळे कुदळे यांची आर्थिक स्थिती खालावली होती. त्यामुळे पुन्हा पैसे देणे शक्‍य नव्हते. विक्रमने सुनीताला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरवात केली. एके दिवशी सुनीता तिच्या मुलींना घेऊन वडिलांच्या घरी गेली. मी पुण्यात दागिने घेण्यासाठी जात आहे, थोडा वेळ मुलींना सांभाळा, असे म्हणून ती गेली. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्यामुळे वडिलांनी जावई विक्रमशी मोबाईलवर संपर्क साधला. त्यावर विक्रमने मी देवदर्शनासाठी काळूबाई येथे मित्रांसमवेत आल्याचे सांगितले. घरी परतल्यानंतर विक्रमने घरात शोधाशोध करण्याचा बहाणा करून सुनीताने लिहिलेली चिठ्ठी आढळल्याचे सांगितले. त्यात तिने माझे एका व्यक्‍तीसोबत प्रेमसंबंध असून, मी त्याच्यासोबत जात आहे, माझ्या मुलींची काळजी घ्या, असे लिहिल्याचे सांगून ती चिठ्ठी तिच्या भावाला दिली. बरीच शोधाशोध करूनही सुनीता घरी न आल्यामुळे तिच्या वडिलांनी वानवडी पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली.

वानवडी पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला. मुलीला सासरी त्रास होता. त्यामुळे वडील आणि भावाला विक्रमवर संशय होता. त्यांनी चिठ्ठीतील हस्ताक्षर सुनीताचे नसल्याचा दावा केला; परंतु विक्रम उडवाउडवीची उत्तरे देत होता. तिचे काहीतरी बरेवाईट झाल्याची शक्‍यता होती. तपास पथकातील तत्कालीन पोलिस निरीक्षक अजित खडके, सहायक निरीक्षक प्रसाद सणस, पोलिस हवालदार अविनाश मराठे, दीपक लांडगे, विजय शिंदे, संभाजी नाईक, संदीप राऊत, राजस शेख आणि रजपूत हे सुनीताचा कसून शोध घेत होते. पोलिसांनी घटनेच्या दिवशीचे विक्रमच्या मोबाईलचे लोकेशन घेतले. ते वरंधा घाटात दाखवत होते. चिठ्ठीतील हस्ताक्षर तपासण्यासाठी ते पत्र हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविले. चिठ्ठीतील हस्ताक्षर सुनीताचे नसल्याचे समोर आले. 

विक्रमला पोलिसी खाक्‍या दाखविल्यानंतर त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. पत्नीला हडपसर येथून गाडीतून नारायणपूर, कापूरहोळ, भोरमार्गे वरंधा घाटात नेले. महाड येण्यापूर्वी चार-पाच किलोमीटर अंतरावर खोल दरीजवळ टर्निंग पॉइंटला गाडी थांबवली. दोघे गाडीबाहेर बोलत थांबले होते. त्या वेळी सुनीता बेसावध असताना तिला पाठीमागून धक्‍का मारून दरीत ढकलून दिल्याचे सांगितले. 

तिचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिस विक्रमला घेऊन वरंधा घाटाकडे रवाना झाले. तिला ढकलून दिल्याचे ठिकाण त्याने दाखविले. कावळा कड्याजवळ हजार फूट खोल दरी आहे. पोलिस पोचले त्या वेळी मध्यरात्र होती.

सगळीकडे अंधार होता. पावसाची भुरभुर सुरू होती. शिवाय हिंस्र प्राण्यांचा वावर... अशा परिस्थितीत पोलिस तसेच पुणे व्हेंचर्स गिर्यारोहण संस्था आणि टाटा मोटर्स यांच्याकडील गिर्यारोहक दत्तात्रेय गणपत प्रभू, सुशील कृष्णराव पाटील, सचिन चंद्रकांत पवार, संजय बाळकृष्ण गोरक्ष, जमीर इक्‍बाल शेख, स्तवन मुकुंद जाधव, अमित दत्तात्रेय प्रभू आणि गणेश घनश्‍याम भांबुरे यांनी शोध घेतला. अखेर डोंगराच्या सातशे फूट खाली कपारीत मृतदेह अडकल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे या वरंधा घाटात मोबाईलला रेंज नाही; परंतु विक्रमचे दुर्दैव इतके की नेमकी घटनास्थळी मोबाईलला रेंज होती. त्यामुळे पोलिसांना त्याचे मिळालेले लोकेशन बरोबर निघाले.

Web Title: murder case solve on hand writing