चारित्र्याच्या संशयावरून गर्भवती पत्नीचा खून;पतीला अटक

चारित्र्याच्या संशयावरून गर्भवती पत्नीचा खून;पतीला अटक

नारायणगाव - चारित्र्याच्या संशयावरून गर्भवती पत्नीचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सोमवारी कांदळी (ता. जुन्नर) येथे घडली होती. नारायणगाव पोलिसांनी केवळ एका चिठ्ठीच्या आधारे तपास करून आरोपी पतीला घटनेनंतर आठ तासांत बेड्या ठोकल्या. 

कविता संजय फुलमाळी (वय २१) हिचा खून केल्याच्या आरोपावरून पती संजय याला नारायणगाव पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली. संजय फुलमाळी (वय २४) हा पत्नी कविता व दोन वर्षांच्या मुलीसह कांदळीत वास्तव्यास होता. शेतात मोलमजुरी करून हे कुटुंब उपजीविका करत होते. कविता चार महिन्यांची गर्भवती होती. संजय तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. कविताचे वडील श्‍याम फुलमाळी हेही कांदळीत राहतात. सोमवारी (ता. ६) दुपारी तीनच्या सुमारास कविता गवत कापण्यासाठी शेतात गेली होती. ती घरी आली नसल्याची माहिती मिळाल्यानंतर तिच्या आईवडिलांनी परिसरातील शेतात शोध घेतला. सायंकाळी पाचच्या सुमारास कविताचा मृतदेह कांदळीतील विशाल कुतळ यांच्या उसाच्या शेतात अर्धनग्न अवस्थेत आढळला. मृतदेहाजवळ चिठ्ठी, तंबाखू व चुन्याची पुडी आढळली. घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठीतील हस्ताक्षर व घरात सापडलेल्या वहीचे फाटलेले पान या आधारे कविताच्या पतीला संशयावरून घोडे पाटील यांनी ताब्यात घेतले. पुढील तपासात त्याने कविताचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले. 

आरोपीचा बनाव उघड 
बलात्कार करून पत्नीचा खून झाला असल्याचा बनाव संजय याने केला होता. मात्र शवविच्छेदन अहवाल, मिळालेली चिठ्ठी, वही यांचा आधार घेत पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या आठ तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com