चालत्या एसटीत तरुणाचा खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

राजगुरुनगर - लग्नास नकार देणाऱ्या मुलीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने तरुणाच्या विरोधात मुलीच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार दिली. या रागातून संबंधित तरुणाने मुलीचा जवळचा नातलग असलेल्या तरुणाचा चालू एसटी बसमध्ये प्रवाशांसमोर कोयत्याने वार करून खून केला. ही घटना दावडी (ता. खेड) येथे मंगळवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास घडली.

राजगुरुनगर - लग्नास नकार देणाऱ्या मुलीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने तरुणाच्या विरोधात मुलीच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार दिली. या रागातून संबंधित तरुणाने मुलीचा जवळचा नातलग असलेल्या तरुणाचा चालू एसटी बसमध्ये प्रवाशांसमोर कोयत्याने वार करून खून केला. ही घटना दावडी (ता. खेड) येथे मंगळवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास घडली.

श्रीनाथ सुदाम खेसे (वय १८, रा. खेसे वस्ती, दावडी, ता. खेड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तो राजगुरुनगर येथे इयत्ता बारावीत शिकत होता. अजित भगवान कान्हूरकर (रा. कान्हूरकर मळा, दावडी, ता. खेड) असे खून करणाऱ्याचे नाव आहे. हे दोघेही परस्परांचे नातलग आहेत.

राजगुरुनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनाथच्या जवळच्या नात्यातील एका मुलीने लग्नाची मागणी नाकारल्याने अजितने तिचे फोटो आणि त्या फोटोसोबत आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी राजगुरुनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. ८) तक्रार दिली होती. त्याचा अजितला राग होता. दरम्यान, मंगळवारी सकाळी श्रीनाथ लहान बहिणीसह गोलेगाव- राजगुरुनगर एसटी बसमध्ये खेसे वस्ती (दावडी) येथे बसला. अजित त्यापूर्वीच आधीच्या गावावरून बसमध्ये मागच्या सीटवर बसून आला होता.

बस जेमतेम एक किलोमीटर गेल्यावर अजित मागून आला आणि त्याने मागच्या बाजूने श्रीनाथच्या डोक्‍यावर आणि मानेवर कोयत्याने वार केले. या गोंधळात बस थांबताच अजित पळून गेला. त्यानंतर चालकाने श्रीनाथला घेऊन बस खासगी रुग्णालयात नेली. मात्र, डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. खेड पोलिसांनी अजितवर खुनाचा व बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मृतदेह स्वीकारण्यास नकार
अजित कान्हूरकर याला अटक केल्याशिवाय आणि हलगर्जी करणाऱ्या पोलिसांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका घेऊन नातेवाइकांनी एसटी बससह श्रीनाथचा मृतदेह राजगुरुनगर पोलिस ठाण्यासमोर ठेवला. या वेळी मोठा जमाव जमला होता. खबरदारी म्हणून पोलिसांनी दंगल नियंत्रण पथक आणि अन्य ठिकाणाहून पोलिसांना बोलाविले. दरम्यान, पुणे जिल्ह्याच्या (ग्रामीण) अतिरिक्त पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलिस अधिकारी राम पठारे यांनी घटनास्थळी जाऊन नातेवाईक व गावकऱ्यांना आश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह पुढील सोपस्करांसाठी पाठविण्यात आला. 

धमकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष
श्रीनाथ व संबंधित मुलगी हे दोघेही अजित कान्हूरकरचे नातेवाईक आहेत. अजितने २३ नोव्हेंबर २०१७ रोजी संबंधित मुलीला लग्न कर म्हणून दमदाटी केली होती. तिचा विनयभंगही केला होता. तेव्हाही तिचे फोटो व्हायरल केले होते. त्याप्रकरणी त्याला अटकही झाली होती. तरीही त्याने पुन्हा फोटो व्हायरल केले आणि लग्न लावून दिले नाही, तर तुम्हाला जिवंत सोडणार, अशी धमकी तिच्या कुटुंबीयांना दिली होती. त्याबाबत तक्रार देऊनही दावडी बीटच्या पोलिसांनी कारवाई केलेली नव्हती. यात बळी गेलेला श्रीनाथ हा आई-वडिलांना एकच मुलगा होता, त्याला दोन बहिणी आहेत. तर, अजित हाही त्याच्या आईवडिलांना एकच मुलगा असून, त्याला एक बहीण आहे.  

उपविभागीय पोलिस अधिकारी राम पठारे हे या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या डी. वाय. सावंत आणि ए. बी. उबाळे या पोलीस कर्मचाऱ्यांचा कसुरी अहवाल सादर करतील. विभागीय चौकशी होऊन त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल. अजितला शोधण्यासाठी तीन पथके रवाना झाली आहेत. 
- तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, पुणे जिल्हा, ग्रामीण

Web Title: murder in ST Bus crime