धक्कादायक! डहाणूकर कॉलनीत वॉचमनचा गळा आवळून खून

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 27 December 2020

तावरेचा भाऊ डहाणूकर कॉलनीतील एका इमारतीत रखवालदार आहे. शुक्रवारी (ता. 25) तो बंगल्याच्या आवारात बेशुद्धावस्थेत पडल्याचे त्याच्या मुलाने पाहिले. त्यानंतर तावरेच्या भावाने त्याला रुग्णालयात दाखल केले.उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या घटनेची माहिती अलंकार पोलिसांना मिळाली.

पुणे : अर्धवट बांधकाम झालेल्या बंगल्यात एका रखवालदाराचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोथरूडमधील डहाणूकर कॉलनी परिसरात ही घटना घडली. दिलीप रवींद्र रावण तावरे (वय 47, सध्या रा. डहाणूकर कॉलनी, गल्ली क्रमांक चार, पुष्पलता बिल्डींगजवळ, कोथरूड) असे खून झालेल्या रखवालदाराचे नाव आहे.

याबाबत पोलिस उपनिरीक्षक धीरज गुप्ता यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तावरे, त्याची आई, दोन मुले ही घटना घडलेल्या अर्धवट बांधकाम झालेल्या बंगल्यात राहायला आहेत. तावरे मद्यपान करीत असल्याने त्यातून होणा-या वादामुळे पत्नीने त्याला सोडून दिले आहे.

तावरेचा भाऊ डहाणूकर कॉलनीतील एका इमारतीत रखवालदार आहे. शुक्रवारी (ता. 25) तो बंगल्याच्या आवारात बेशुद्धावस्थेत पडल्याचे त्याच्या मुलाने पाहिले. त्यानंतर तावरेच्या भावाने त्याला रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या घटनेची माहिती अलंकार पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवून दिला. शवविच्छेदन अहवालात तावरेचा गळा दाबल्याने तसेच त्याला मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अलंकार पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन जगदाळे यांनी दिली. तावरेच्या खुनामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिस निरीक्षक जगदाळे पुढील तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder by strangulation of a guard in Dahanukar Colony Pune