प्रेयसीचा खून करणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

दहा वर्षांनंतर खुनाचे गूढ उकलले; आरोपी वेश्‍या व्यवसाय रॅकेटचा सूत्रधार
पुणे - साथीदाराच्या मदतीने प्रेयसीचा खून करून पुरावा नष्ट करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या गुंडा स्कॉडने (उत्तर) अटक केली. दहा वर्षांपूर्वी घडलेल्या या खुनाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे.

दहा वर्षांनंतर खुनाचे गूढ उकलले; आरोपी वेश्‍या व्यवसाय रॅकेटचा सूत्रधार
पुणे - साथीदाराच्या मदतीने प्रेयसीचा खून करून पुरावा नष्ट करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या गुंडा स्कॉडने (उत्तर) अटक केली. दहा वर्षांपूर्वी घडलेल्या या खुनाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे.

आरोपी हा येथील वेश्‍या व्यवसाय रॅकेटचा सूत्रधार असून, सूर्यप्रकाश फाउंडेशन ही संस्था चालवत असल्याची माहिती पोलिस उपायुक्‍त पी. आर. पाटील आणि सहायक आयुक्‍त अरुण वालतुरे यांनी दिली.

संतोष नंदकिशोर कातोरे (रा. श्रॉफ सृष्टी, म्हाळुंगे, ता. मुळशी) असे आरोपीचे नाव आहे. त्याने साथीदाराच्या मदतीने अर्चना दगडू सांगळे (वय 30, रा. सांगवी) यांचा गळा आवळून खून केला होता. त्या एका शाळेत शिक्षिकेची नोकरी करत होत्या. त्यांचे पतीसोबत सतत वाद होत असत. दरम्यान, या महिलेची कातोरे याच्यासोबत ओळख झाली.

त्यानंतर दोघांनी मिळून डिसेंबर 2005 मध्ये बाणेर परिसरात संस्कृती प्रांगण येथे फ्लॅट खरेदी केला; परंतु नोव्हेंबर 2006 पासून अर्चना बेपत्ता झाल्या. याबाबत वडील दगडू सांगळे यांनी तक्रार दिली. त्यावरून चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात अपहरण झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात कातोरे याला अटकही झाली होती; मात्र नंतर त्याला या गुन्ह्यातून वगळण्यात आले. त्याने हवेली येथील दुय्यम निबंधक कार्यालयातून बनावट कागदपत्रांच्या आधारे फ्लॅटची विक्री केल्याची माहिती समोर आली. याबाबत गुंडा विरोधी स्कॉडचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद गायकवाड यांना माहिती मिळाली. त्यावरून खडकी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी कातोरे याला मंगळवारी (ता. 17) अटक केली. बाणेर येथील फ्लॅटच्या विक्रीवरून अर्चनासोबत वाद झाला होता. त्यामुळे त्याने एक नोव्हेंबर 2006 रोजी तिला कोल्हापूर येथे देवदर्शनाच्या बहाण्याने नेले. तेथून परत येताना किल्ले मच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथे साथीदाराच्या मदतीने तिचा खून केला. न्यायालयाने आरोपीला 24 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. वरिष्ठ निरीक्षक मिलिंद गायकवाड, सहायक निरीक्षक रणजित भोईटे, कर्मचारी नागेश भोसले, विष्णू पांडूळे, अब्दुल करीम सय्यद, राजेंद्र मोरे, रमेश भिसे, शीतल शिंदे, नाना जगताप आदी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्‍त केली आहे.

"पिटा'तील गुन्हेगाराचे सूर्यप्रकाश फाउंडेशन
वेश्‍या व्यवसाय चालविणाऱ्या संतोष कातोरे याच्याविरुद्ध हिंजवडीसह अन्य ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्याने दोन वर्षांपूर्वी सूर्यप्रकाश फाउंडेशन ही सामाजिक संस्था स्थापन केली होती. पोलिस त्या फाउंडेशनच्या कामाबाबत माहिती घेत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर त्याला इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

Web Title: murderer arrested