त्या पोरांना आत का सोडले म्हणत सुरक्षारक्षकांवर कोयत्याने वार; दोन सुरक्षारक्षक जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murderer Attack

'तुम्हाला माहिती नाही का मी इथला भाई आहे. त्या पोरांना गेटमधून आत का सोडले?' असं म्हणत सुरक्षारक्षकांवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना खानापूर येथे घडली आहे.

Sinhgad Crime : त्या पोरांना आत का सोडले म्हणत सुरक्षारक्षकांवर कोयत्याने वार; दोन सुरक्षारक्षक जखमी

सिंहगड - 'तुम्हाला माहिती नाही का मी इथला भाई आहे. त्या पोरांना गेटमधून आत का सोडले?' असं म्हणत आकाश गणपत भिकुले (वय अंदाजे 27 रा. बंगला नं. 27, आनंदवन सोसायटी, खानापूर ता. हवेली) याने सुरक्षारक्षकांवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना मते गेट, खानापूर येथे घडली आहे. यामध्ये गोविंद शिवाजी काकडे व ज्ञानेश भिमराव कांबळे हे दोन सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाले असून आकाश भिकुले याच्या विरोधात हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश भिकुले याची काही तरुणांसोबत बाचाबाची झाली होती. काल (दि. 28 फेब्रुवारी) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते तरुण आनंदवन सोसायटीतील भिकुले याच्या घरी आले व त्यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. ते तरुण गेल्यानंतर आकाश भिकुले हा गेटवर आला व तुम्ही त्या पोरांना आतच कसे सोडले असे म्हणत सुरक्षारक्षकांबरोबर हुज्जत घालू लागला. अचानक आकाश भिकुले याने सोबत आणलेल्या कोयत्याने ज्ञानेश कांबळे याच्या डोक्यावर वार केला. त्यावेळी गोविंद काकडे हा सुरक्षारक्षक मधे गेला असता त्याच्याही पायावर आकाशने वार केले.

सुरक्षारक्षकांनी आरडाओरड केल्यानंतर आकाश भिकुले तेथून पळून गेला. याबाबत माहिती मिळताच हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून आकाश भिकुले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो फरार असून पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे याबाबत अधिक तपास करत आहेत.